८२ कैद्यांना कोरोनाची लागण
अनिल पाटील । राष्ट्र सह्याद्री
कोल्हापूरः
कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात कारावास भोगणाऱ्या ८२ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एकाच वेळी मोठ्या संख्येने कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याने कळंबा कारागृह प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशावेळी कळंबा कारागृहातील तब्बल ८२ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोरोनाने गेल्या ४८ तासांत कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी ६२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यू संख्या ७९४ इतकी झाली आहे. मागील दोन दिवसांत जिल्ह्यात नव्याने १ हजार ९०८ कोरोनाबाधित सापडल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा २५ हजार ९८९ वर गेला आहे.
आजपर्यंत उपचार घेत असलेल्या १६ हजार ४२४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मृतांमध्ये शहरातील सर्वाधिक १५ जणांचा समावेश आहे.
कोल्हापूर शहरात आजपर्यंत एकूण बाधितांची संख्या ८ हजार २११ इतकी आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मृत्यूचे हे सर्वाधिक प्रमाण आहे.
सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याचा धोका अगोदरच वर्तवण्यात आला होता.