गुरा-ढोरांना क्वारंटाईन करण्याची वेळ
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
वर्धा हिंगोली परिसरात गोवंशाला लंम्पी स्किन डिसीज या विषाणूनजन्य आजाराचा संसर्ग झाला आहे. वर्धा हिंगोलीत तब्बल साडेतीन हजार गुरांना हा आजार झाला असून दिवसेंदिवस याची तीव्रता वाढत आहे. परिसरातील गुरा-ढोरांना क्वारंटाईन करण्याची वेळ आली आहे.
वर्धा जिल्ह्यात तब्बल 3 हजार 628 लंम्पी स्कीन डिसीजबाधित जनावरांची नोंद आतापर्यंत घेण्यात आली आहे. त्यापैकी 2 हजार 518 जनावरांनी त्यावर मात केली आहे. सद्यस्थितीत 1 हजार 110 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात येते (Lumpy Skin Disease).
‘लंम्पी स्कीन डिसीज’ या विषाणूचा संसर्ग झालेल्या जनावरांच्या त्वचेवर छोट्याछोट्या गाठी येतात. अशातच जनावर अन्नपाणी सेवन करण्याचे सोडतात. काही जनावरांचा या विषाणूजन्य आजारामुळे मृत्यूही झाला आहे. त्यामुळे गौपालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या जनावरांना प्रतिबंधात्मक लस असलेली ‘गोट फॉक्स वॅक्सिन’ टोचून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
47,500 लसींची खरेदी
‘लम्पी स्कीन डिसीज’या विषाणूच्या प्रसाराला अटकाव घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने शेष फंडातून तीन लाखांचा निधी खर्च करुन 47 हजार 500 नग ‘गोट फॉक्स’ ही प्रतिबंधात्मक लस खरेदी केली आहे. सध्या ही लस जिल्ह्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध असून बुधवार 2 सप्टेंबरपासून जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ पिंपळगाव (माथनकर) येथून करण्यात आला.