प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
लहान, बालके व नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून संशयित कोरोना रुग्णांचा थाॅट स्वॅब नमुना चाचणी नगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेण्यास नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी विरोध दर्शविला आहे.
नुकत्याच झालेल्या प्रांताधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार लहू कानडे यांनी संशयित कोरोना रुग्णांचा थाॅट स्वॅब नमुना चाचणी नगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेण्यात यावी अशी सूचना केली होती.
तसेच पालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांनीही रुग्ण वाहून नेण्यासाठी वाहनाची सुविधा देण्याची तयारी दर्शवली त्यानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी पालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन पन्हे व प्रयोगशाळा तंत्रज्ञ उबाळे यांनी काल लेखी पत्र देऊन पालिकेच्या रुग्णालयात कोरोना संशयितांचे घश्याचे स्त्राव घेण्याचे आदेश दिले.
या निर्णयाचा नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी विरोध करुन अश्या चाचण्या नगरपालिका रुग्णालयात घेतल्या जाऊ नयेत, कारण या प्राथमिक आरोग्य केंद्रात शहरातील नवजात बालकांना लसीकरणासाठी आणले जाते. गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे याठिकाणी चाचणी करण्यात येऊ नये. यात गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नगरपालिका रूग्णालयात अशा प्रकारची ही चाचणी याठिकाणी करू नये, असे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सांगितले.