प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचे खासगी निवासस्थान ‘मातोश्री’ला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. एका निनावी कॉलद्वारे त्यांना ही धमकी मिळाली आहे. कॉल करणा-याने आपण दाऊद गँगचा हस्तक असल्याचे सांगितले. परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी याबाबत शिवसेनेच्या वतीने अधिकृत माहिती दिली आहे.
या कॉलमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी तातडीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. वांद्रे कलानगर येथे मातोश्री निवासस्थान असून मातोश्रीतील लँडलाइनवर धमकीचे तीन ते चार कॉल आले आहेत. समोरच्या व्यक्तीने आपण दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचा दावा करत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. हे कॉल दुबईतून आले होते, अशी माहिती मिळत आहे.
आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास हे धमकीचे कॉल आले. मातोश्री निवासस्थानी ड्युटीवर असलेल्या पोलीस ऑपरेटरने हे कॉल घेतले, असेही सांगण्यात आले. धमकीचे फोन आल्यानंतर त्याबाबत तातडीने पोलिसांना कळवण्यात आले असून पोलिसांनी गंभीर दखल घेत मातोश्रीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. मातोश्री निवासस्थानाला विशेष सुरक्षा पुरवण्यात आली आहे.