Shirdi : साईबाबा संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांना नोटीस

1
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

औरंगाबाद – साईबाबा संस्थान शिर्डीचे कामकाज चालविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नेमलेल्या तदर्थ समितीच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करीत नसल्याने संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे, यांना नोटीस बजावून खंडपीठात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश न्या. संजय गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिले आहेत.

शिर्डी येथील माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी साईबाबा संस्थान ट्रस्ट येथे नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. खंडपीठाने नवीन विश्वस्त शासनामार्फत नियुक्त करेपर्यंत प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त विभागीय आयुक्त, नासिक व सह धर्मादाय आयुक्त, अहमदनगर यांची तदर्थ समिती गठित करून त्यांना धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार ०९ ऑक्टोंबर २०१९ च्या आदेशान्वये दिले होते. सदर समिती ऑक्टोबर २०१९ पासून साईबाबा संस्थानचा कार्यभार सांभाळत असून उच्च
न्यायालयाच्या परवानगीने धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेत आहे.
दरम्यान, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तदर्थ समितीच्या इतर सदस्यांना न विचारता व खंडपीठाची पूर्व  परवानगी न घेता धोरणात्मक व आर्थिक निर्णय  घेऊन गैरव्यवहार केल्याबद्दलचा अहवाल प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर यांनी सादर केला. खंडपीठाने प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर यांनी सादर केलेल्या अहवालानुसार साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तदर्थ समितीच्या इतर सदस्यांना न विचारता व खंडपीठाची पूर्व परवानगी न घेता धोरणात्मक व आर्थिक निर्णय  घेऊन गैरव्यवहार केल्याबद्दलचे निरीक्षण नोंदवत तदर्थ समितीच्या रचनेत व अधिकाराचे धोरण स्पष्ट केले होते.

त्यानंतर तदर्थ समितीच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी आडकाठी निर्माण करत असून तदर्थ समितीचे कामकाज सुरळीत होऊ देत नसल्याचा अहवाल अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर यांनी खंडपीठात सादर केला. सदर
अहवालाची दखल घेत  बगाटे यांना २३ सप्टेंबर २०२० रोजी खंडपीठात हजर राहण्याचे आदेश केले.
सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. सतीश तळेकर, प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे काम पाहत आहे व संस्थान च्या वतीने अॅड. संजय चौकीदार, शासनाच्या वतीने मुख्य सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी काम पाहिले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here