प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि १७
कर्जत : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम लोकसहभागातून आणि राजकीय विषय बाजूला ठेवून यशस्वीपणे राबवायची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सहकार्याची भावना ठेवत नागरिकांना या कोरोना महामारीतून बाहेर काढणे आवश्यक आहे, असे मत आमदार रोहित पवार यांनी केले. ते गुरुवारी कर्जत तहसिल कार्यालयाच्या सभागृहात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’या मोहिमेचे शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, नायब तहसिलदार मनोज भोसेकर, सुरेश वाघचौरे, जि. प. सभापती उमेश परहर, नगराध्यक्षा प्रतिभा भैलूमे, पं. स. सभापती अश्विनी कानगुडे, उपसभापती हेमंत मोरे, सदस्य राजेंद्र गुंड, काकासाहेब तापकीर आदी. उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाले की, देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी नागरिकांनी ताळेबंदीच्या काळात घरात राहून अनेक अडचणीचा सामना केला. हा रोग नेमका कशाने पसरतो आहे हे कळत नाही. काही ठिकाणी लोक कुठेही बाहेर गेले नाही त्यांच्यातही हा रोग आढळला आहे. आणि आता दळणवळण सुरू झाल्याने रोगाचा प्रसार वाढतो आहे. त्यामुळे आता आजारी लोक शोधून त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी आहे. हा रोग भारतात नाही तर जगात पसरतो आहे. त्यामुळे अधिक जबाबदारीने काम करावे लागणार आहे.
कर्जत तालुक्यात कमी अधिक साडेतीन हजार लोकांनी कोरोना वॉरीयर्स म्हणून काम केले आहे, त्यांचे अभिनंदन. साधनं कमी आहे म्हणून लवकरच आपण ऑक्सीमिटर आणि थर्मामिटर देणार आहे. बेडही उपलब्ध करून येत्या सात दिवसात स्वतः शरद पवार साहेब आपल्याला ऑक्सिजनसह मोठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार असल्याचे म्हंटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसिलदार सुरेश वाघचौरे यांनी केले तर आभार मंडळ अधिकारी श्रीरंग अनारसे यांनी मानले.
आरोग्यासाठी ८०%ऑक्सीजन लागते आहे
पूर्वी ४०% ऑक्सिजन आरोग्यासाठी लागत होते आणि उद्योगासाठी ६०%लागत होते. आता कोरोनामुळे आरोग्यासाठी ८०%ऑक्सीजन लागते आणि उद्योगासाठी फक्त २०% उपलब्ध आहे. आपल्या मतदारसंघात ऑक्सीजन लवकरच उपलब्ध होण्यासाठी आपण टाक्या उपलब्ध करणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.