Human interest : Shrirampur : ‘या’ अधिका-याच्या रुपात ‘त्या’ आजीबाईंना भेटला देव

    0

    प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

    अधिकारी देखील माणूसच असतो. अन् त्या अधिका-यातही माणूसकी दडलेली असते याचा प्रत्यय श्रीरामपूर तहसील कार्यालयात आलेल्या एका आजीबाईंना आला. 
    ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध योजनेचे मानधन मिळत असते. मात्र, अनुदान सुरळीत ठेवण्यासाठी वेळोवेळी हयातीचे व इतर कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करावी लागतात. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत असलेली अशीच एक ज्येष्ठ महिला तहसील कार्यालयात तळमजल्यावर बसलेली होती. सकाळी नेहमीप्रमाणे तहसीलदार प्रशांत पाटील हे कार्यालयात आले जिन्याच्या पाय-या चढत असाताना त्यांची नजर त्या ज्येष्ठ महिलेवर गेली ही महिला येथे आली म्हणजे हिचे नक्कीच तहसील कार्यालयात रेशन र्काडाचे काम असावे, अशी शंका आली. ते जिना उतरुन त्या आजीबाई जवळ आले.

    वयाने अतिशय ज्येष्ठ असलेल्या महिलेस तहसीलदार पाटील यांनी आजी काय काम आहे असे विचारले असता त्या आजीबाईंनी मला डोल मिळत आहे, परंतु काही कागदपत्रे जमा केली नाही तर तो बंद होईल, असा निरोप आल्यामुळे गावातून आले.

    तहसीलदार पाटील यांनी तातडीने संजय गांधी निराधार योजनेचे काम पाहत असलेल्या अधिकाऱ्यांना खाली बोलविले अन् सर्व कागदपत्रांची पूर्तता बघून घेण्यास सांगितले. पाटील फक्त आदेश देऊन तेथून निघाले नाही. तर त्या आजींचे संपूर्ण काम होईपर्यंत तहसीलदार पाटील स्वतः तिथेच उभे राहिले.
    त्या आजींचे काम झाल्यावर तहसीलदार पाटील हे कार्यालयात जाण्यासाठी जिना चढू लागले तोच त्या आजींनी पुन्हा हाक मारली. आणखी काही काम बाकी असेल म्हणून हाक मारली असे वाटल्याने ते पुन्हा त्या आजींजवळ गेले. मोठ्या आस्थेने विचारले आणखी काही काम आहे का आजी? त्यावर ‘या’ आजी म्हणाल्या काम तर झाले पण दोन चार रुपये दिले असते तर फार बरे झाले असते. गावाकडे जायला…
    आजींचे बोल संपत नाहीत तोपर्यंत तहसीलदार पाटील यांनी आपल्या खिशातून पाचशे रुपयाची नोट काढून ‘त्या’
    आजीबाईंना दिली. अन् क्षणाचाही विचार न करता कार्यालयात गेले. हे सर्व तिथे उभे असलेले नागरिक पाहत होते. पाटील गेल्यानंतर एकाने ‘त्या’ आजीबाई जवळ जावून विचारले आजी तो माणूस कोण होता माहिती आहे का? त्यावर आजींनी नाही माहित म्हणत कोण होते असे विचारले. त्या व्यक्तीने सांगितले ते तालुक्याचे तहसीलदार प्रशांत पाटील आहे.
    तहसीलदार स्वतःच होते हे ऐकताच आजींच्या डोळ्यात खळकन पाणी आले. अन् आजीबाई इतकच म्हणाल्या त्यांच्या रुपात माझा देवच आला होता. मला मदत करायला.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here