आरोपीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
कंपनीत कामाला जाण्यासाठी निघालेल्या सुरक्षारक्षकाला रस्त्यात अडवून पेट्रोल संपल्याचा बहाणा करीत लुटणा-या दोघांपैकी एकाला पुंडलिकनगर पोलिसांनी शुक्रवारी (दि.१८) पहाटे गजाआड केले. राहुल उर्फ राणा बाजीराव सोळंके (वय २१, रा.साईनगर, हनुमान टेकडी परिसर), असे पोलिसांनी गजाआड केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला सोमवारपर्यंत (दि.२१) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.वाडकर यांनी दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश मिथलेशकुमार झा (वय ३०, मुळ रा. जगतपुर जि. बाका बिहार , ह.मु. राजनगर, मुवंâदवाडी) हे एसआयएस सेक्युरिटीच्या वतीने रेल्वेस्टेशन एमआयडीसी परिसरातील ऋचा इंजिनियरींग प्रा.लि. या कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला आहेत. १४ सप्टेंबर रोजी नितीश झा हे आपल्या दुचाकीवरून कंपनीत कामासाठी जात होते. त्यावेळी मुकुंदवाडी रेल्वेपटरी उभ्या असलेल्या दोन जणांनी आमच्या दुचाकीतील पेट्रोल संपले असून १०० रूपयांचे पेट्रोल द्या, अशी मागणी केली.
त्यावेळी झा यांनी नकार दिला असता, दोघांनी बळजबरीने झा यांच्या दुचाकीतील बाटलीभर पेट्रोल काढून आपली दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एएन-१४८४) मध्ये टाकले होते. त्यानंतर दोघांनी झा यांच्या तोंडावर स्प्रे मारून त्यांच्या खिशातील मोबाईल रोख रक्कम, असा ९ हजाराचा ऐवज हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या राहुल उर्फ राणा सोळंके याच्या ताब्यातून पोलिसांनी एक हजार रूपये रोख रक्कम, एक मंगळसूत्र, दोन झुंबर, एक दुचाकी असा एकूण ५१ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.