प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे व्हा. वाचनाने सशक्त झालेले मस्तक कधीही लाचार बनत नसते. असे स्वाभिमानी मस्तक घडविण्यासाठी वाचनाशिवाय पर्यायच नाही. या उदात्त हेतूने यशवंत प्रतिष्ठानचे (सोनई ता. नेवासा) अध्यक्ष प्रशांतभाऊ गडाख यांनी चिंभळे (ता.श्रीगोंदा) येथील हरित परिवार संचलित ज्ञानसागर वाचनालयास 30 हजार रुपये किंमतीच्या स्पर्धापरीक्षा व अवांतर वाचनाच्या पुस्तकांची अनमोल भेट दिली.
हरित परिवाराने चिंभळे येथे ओसाड जमिनीवर वृक्षारोपण करून नंदनवन फुलविले आहे. गावातील भरकटलेल्या तरुणांना योग्य दिशा मिळावी; त्यांच्यामधून भावी अधिकारी घडावेत या उदात्त हेतूने ज्ञानसागर वाचनालय सुरु करण्यात आले. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निरपेक्ष वृत्तीने काम करणार्या हरित परिवाराच्या कामाचे कौतुक प्रशांत गडाख यांनी केले. गरज भासल्यास पुन्हा मदत देण्याचे आश्वासनही गडाख यांनी दिले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरदराव कुदांडे, यशवंत प्रतिष्ठानचे देवदत्त दरंदले सर, दिगंबर सोनवणे सर, रमेश आण्णा गायकवाड सरपंच, राजेंद्र गायकवाड, शिवाजीराव गायकवाड ,रमजान हवालदार , संतोष गायकवाड सर , डॉ. सचिन जाधव, लगड साहेब तसेच हरित परिवार संचलित ज्ञानसागर सार्वजनिक वाचनालयाचे स्वयंसेवक आणि ग्रामस्थ हे शासनाच्या सामाजिक अंतराचे भान ठेवून उपस्थित होते.