संभाजी ब्रिगेडचा पोलीस भरतीला विरोध ! मुख्यंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
महाराष्ट्रातील बहुसंख्य आणि मुख्य समाज असणार्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिलेली आहे. तसेच सदर प्रकरण सध्या न्याय प्रविष्ठ आहे. अशा परिस्थितीमध्ये दिनांक १६ सप्टेंबर २०२० रोजीच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडी सरकारने पोलीस शिपाई भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निर्णयाचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध केला आहे. याबाबत श्रीगोंदा संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्थानिक प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि जीवनमरणाचा प्रश्न असणारे मराठा आरक्षण सध्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे, न्यायप्रविष्ठ आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोलीस शिपाई भरतीसाठी सुमारे १२,५३८ इतकी पदे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय मराठा समाजावर अन्याय करणारा आणि आधीच मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे चिडलेल्या मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती असताना अशा प्रकारची पोलीस भरती काढणे म्हणजे मराठा समाजाचा आणि मराठा तरुणांचा नोकरीचा हक्क डावलण्यासारखे असल्याचे मत यात नमूद केले आहे.
शासनाचा निर्णय मराठा समाजाचा भावना तीव्र करणारा आणि मराठा समाजाला जाणीवपूर्वक डिवचण्याचा असून, असा आमचा आपल्या महाविकास आघाडी सरकारवर थेट आरोप आहे, असे निवेदन स्थानिक प्रशासनामार्फत काल (दि. १८) मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
यावेळी (संभाजी ब्रिगेड श्रीगोंदा तालुकाध्यक्ष) नानासाहेब शिंदे, (माजी तालुकाध्यक्ष) अरविंद कापसे, सुनीलजी ढवळे, गणेश पारे, सागर हिरडे ,शिवाजी रोही, मयूर आढाव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.