खड्ड्यात पावसाचे पाणी साचून अपघाताची मालिका नित्याचीच
प्रतिनिधी | राजेंद्र जैन | राष्ट्र सह्याद्री
तालुक्यातून जात असलेल्या नगर-बीड महामार्गावर पडलेल्या भरमसाट खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे. पादचारी, वाहनचालकांना खड्ड्यातून रस्ता शोधताना अक्षरश: कसरत करावी लागतेय. याच खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे अपघातांची मालिका आता नित्याचीच झाली असून सार्वजनिक बांधकाम खातं मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याने एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतिक्षा करीत आहे की काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
आष्टी तालुक्यातील नगर- बीड मुख्य महामार्गावर हजारो खड्डे पडल्यामुळे रस्त्यांची अतिशय जीवघेणी दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताची मालिका आता नित्याचीच पाहावयास मिळत आहे. खड्ड्यातून रस्ता शोधताना पादचारी, वाहनधारकांची अक्षरश: दमछाक होताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे जागोजागी खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
त्यामुळे ब-याचदा वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने हेच खड्डे जीवघेणे ठरत आहेत. सार्वजनिक बांधकाम खाते मात्र खड्ड्यांकडे उघड्या डोळ्यांनी पाहूनही कसलीच कारवाई करताना दिसत नाही. दरवर्षी नेहमीप्रमाणे रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करुन खड्डे बुजविले जातात. परंतू रस्त्याची दुरास्था कायम जैसे-थेच राहाते. त्यामुळे सा. बा. खाते रस्त्यावर पडलेले खड्डे भरतात की, गुत्तेदारांचे खिसे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
सार्वजनिक बांधकाम खातं मोठ्या अपघाताची प्रतीक्षा करतंय काय ?
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तालुक्यातील रस्त्यांची पुरती वाट लागली असून रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताची मालिका वाहन चालकांसाठी जीवघेणी ठरत आहे. त्यामुळे सा.बा. खाते रस्त्यांची दुरुस्ती करणाऱ आहे की, मोठ्या अपघाताची प्रतिक्षा, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.