साईबाबा संस्थानच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

    1

    डॉक्टरला अटक

    प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

    साईबाबा संस्थानच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

    पीडित मुलीला कोरोनासदृश लक्षणे आढळ्याने मुलगी तपासणीसाठी गेल्यानंतर हा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित मुलगी 19 सप्टेंबरला ताप आणि श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे, वडिलांसोबत साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात तपासणीसाठी गेली. डॉक्टरने वडिलांना बाहेर थांबवत मुलीला अपघात विभागात नेले. तपासणी करत असताना आरोपी डॉक्टरने मुलीला नको त्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

    मुलीने वडिलांना बोलवत ‘इथे उपचार नको’ असे सांगितले. पण तपासणी करताना अनावधानाने हात लागला असेल म्हणून वडिलांनी मुलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.

    प्रकाराची शाहनिशा करण्यासाठी ऑडिओ रेकॉर्डिंगचा वापर

    घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य ओळखून शाहानिशा करण्यासाठी पीडित मुलीच्या वडिलांनी मोबाईलमधील ऑडिओ रेकॉर्डिंगचा वापर केला. मुलीचे वडील दुसऱ्या दिवशी मुलीला पुन्हा दवाखान्यात घेऊन गेले. मुलीच्या हातात मोबाईलमधील ऑडिओ रेकॉर्डिंग सुरु करुन डॉक्टरकडे पाठवले.

    पूर्ण रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर मुलीच्या विनयभंगाची घटना खरी असल्याचे पीडित मुलीच्या वडिलांना पटले. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी धाडस करत शिर्डी पोलीस ठाण्यात डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत कलम 8 आणि 10 नुसार तसेच भा.द.वि कलम 354 ( अ ),( ब ) अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली.

    दरम्यान पीडित मुलीला कोरोनासदृश लक्षणे आढळ्याने मुलगी तपासणीसाठी गेल्यानंतर हा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी कोव्हिड सेंटरमध्ये महिलांवर बलात्काराचे प्रकारही घडले आहेत. एकीकडे कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे, तर दुसरीकडे तपासणी करण्यास गेले असता असे गंभीर प्रकार घडत आहेत. त्यामुळे महिलांच्या असुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

     

    1 COMMENT

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here