प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यांना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अपघात झालेल्या व्यक्तींना व कुटूंबांना मोठ्या प्रमाणात मिळणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली.
गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०१५-१६ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी २०१९-२० मध्ये योजनेची व्याप्ती वाढवून योजनेमध्ये राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये आई-वडील, शेतकऱ्यांची पती,पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांपैकी कोणत्याही एका व्यक्तीना प्राधान्य राहिल. सर्व १० ते ७५ वयोगटातील एकूण दोन जणांना गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास १९ सप्टेंबर २०१९ रोजी शासनाने मान्यता दिली आहे.
त्यानुसार अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता सुमारे १.५२ कोटी वहितीधारक खातेदार शेतकऱ्यांना मिळणार आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणत्याही एक सदस्याचा देखील या विमा योजनेअंतर्गत समावेश करून एकूण ३ कोटी ४ लाख जणांचा समावेश योजनेत करण्यात आला आहे. खातेदार शेतक-यांच्या वतीने शासन स्वतः विमा हप्ता भरते.
शेतकऱ्यांनी कार्यक्षेत्रातील एखादा वहितीधारक शेतकऱ्याचा, त्याच्या कुटुंबातील सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपंगत्व आल्यास त्याच्या वारसदारास योजनेचा लाभ होऊ शकतो. शेतकऱ्यांनी घडलेल्या दुर्घटनाग्रस्त शेतक-यांची यादी दर महिन्यास जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांना उपलब्ध करुन देण्यात यावी. जेणेकरून दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास पात्र मदत मिळण्यासाठी विमा प्रस्ताव विमा कंपनीस सादर करता येईल, अशीही माहिती सुत्रांनी दिली.