भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, आरपीआय व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहरातील क्रांतीचौकात देशव्यापी भारत बंद, रास्ता रोको व निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते व शेतक-यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत तीनही कृषी विधेयकांची होळी केली.
भाकपचे राज्य कौन्सिल सदस्य संजय नांगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय फुंदे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगरे, किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापुराव राशिनकर आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
दत्तात्रेय फुंदे म्हणाले की, भारतीय शेतकरी आणि भूमिहीनांच्या दर तासाला दोन आत्महत्या होत आहेत, पण ‘आत्मनिर्भर भारता’च्या फसव्या घोषणा देऊन भाजपचे मोदी सरकार केवळ बड्या कंपन्यांचीच धन करीत आहे. शेतकरी विधेयकाला/कायद्याला विरोध करण्याचे आणि ‘कर्जमुक्ती, पूरा दाम’ या मागण्यांसाठी किसान सभा संघर्ष समन्वय समितीने सुचवलेली दोन्ही विधेयके पास करण्यास केंद्र सरकारला भाग पाडण्यासाठी आमचा या आंदोलना सक्रिय पाठिंबा आहे.