प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
कर्जत पोलीस ठाण्यातील सात पोलीस कर्मचारी तर राशीन येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल सकारात्मक प्राप्त झाला असून कर्जत पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वीच कर्जत उपकारागृहातील २७ आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने गार्ड कर्तव्यावर नियुक्त असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची रविवारी कोरोना चाचणी घेण्यात आली होती. कर्जत तालुक्यात रविवारी (दि २७) एकूण ३१ व्यक्तींचा कोरोना अहवाल सकारात्मक प्राप्त झाला आहे, अशी माहिती तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे. आज अखेर कर्जत तालुक्यातील १२१४ व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत.
कर्जत उपकारागृहातील ४८ आरोपीची शुक्रवारी (दि.25) कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी २७ आरोपी कोरोनाबाधित आढळले होते. याच पार्श्वभूमीवर गार्ड ड्यूटीवर नियुक्त असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची रविवारी कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये कर्जत पोलीस ठाण्यातील ७ तर राशीन दूरक्षेत्रातील एक पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल सकारात्मक प्राप्त झाला आहे, अशी माहिती तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.
यासह रविवारी इतर २३ व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये कर्जत ५, मिरजगाव ५, कुलधरण ४, राशीन २, चापडगाव २, गुरवपिंपरी १, बेनवडी १, जळकेवाडी १, हिंगणी १ तर शेगुड येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. आजमितीस कर्जत तालुक्यातील १२१४ व्यक्ती कोरोना बाधित आढळले असून यामध्ये कर्जत शहर ३१४ तर ग्रामीण भागातील ९०० व्यक्तीचा समावेश आहे. यामध्ये १७ व्यक्तीचा कोरोना अहवाल प्रलंबित आहे. तर कर्जत तालुक्यातील २३ व्यक्तीचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.