प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
शेवगाव शहरासह तालुक्यातील विविध राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावर खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याची परिस्थिती आहे. हे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने बुजवावेत या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे व जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ भागवत यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव शहरातील गाडगेबाबा चौकातील शेवगाव नगर राज्य मार्गावर वृक्षारोपण करीत प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.
येत्या आठ दिवसात हे खड्डे बुजविले गेले नाहीत तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी दिला आहे. शेवगाव तालुक्यात शेवगाव- पैठण,शेवगाव-गेवराई,शेवगाव- मिरीमार्ग नगर ,शेवगाव -पाथर्डी या प्रमुख राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेक अपघात या मार्गावर नेहमीच घडत आहेत.
यावर स्थानिक लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे. वेळोवेळी पाठपुरावा करून देखील शासन याकडे दुर्लक्ष करीत असून हे खड्डे तातडीने बुजवून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करत शेवगाव शहरातील विविध शेवगाव-नगर राज्य मार्गावर गाडगेबाबा चौकात मनसेच्या वतीने खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, उपजिल्हा अध्यक्ष गोकुळ भागवत तालुका उपाध्यक्ष संजय वणवे शेवगाव शहर विभागध्यक्ष सुनिल काथवटे, उपशहराध्यक्ष संदिप देशमुख,देवा हुशार, विठ्ठल दुधाळ,ज्ञानेश्वर कुसळकर,रविंद्र भोकरे,प्रसाद लिंगे,सुरेश सुर्यवंशी,मंगेश लोंढे,विलास सुरवसे, मनसे विद्यार्थी सेनेचे अमोल पालवे,मंदार मुळे,शशिकांत हुशार,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.