उद्धव ठाकरेना शंभर प्रश्न विचारले तर कॉपी करूनही उत्तर देता येणार नाही; चंद्रकांत पाटील

0

कोल्हापूर : महाविकास आघाडीला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. प्रशासन चालवणे  आणि पक्ष चालविणे यात फरक आहे. उद्धव ठाकरेंचा प्रशासनाशी काय संबंध? उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत. त्यांना प्रशासनाशी संबंधित शंभर प्रश्न विचारले तर कॉपी करूनही उत्तरे देता येणार नाही, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की,  उद्धव ठाकरे कधी आमदार झाले नाहीत. कधी खासदार झाले नाहीत. कधी नगरसेवकही झाले नाहीत आणि स्थायी समितीचे अध्यक्षही झाले नाहीत.

प्रशासन चालवताना कोर्टात हजार प्रश्न घेऊन बसावे लागते किंवा संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न हाताळण्याचे आदेश द्यावे लागतात. प्रशासनावर वचक असणे ही वेगळी बाब आहे, असे सांगतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही पक्षावरच कायम नियंत्रण  ठेवले मात्र कधीच निवडणूक लढवली नाही. बाळासाहेबांनी जो नियम पाळला. तो उद्धव ठाकरेंनी पाळला नाही. एकदम अंगावर जबाबदारी पडल्यावर असे होते त्यामुळेच राज्यातील प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आले आहे, असे पाटील म्हणाले.

सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांनी सर्व्हे करावा आणि उद्धव ठाकरे प्रशासनात योग्य आहेत असे वाटते का? असा प्रश्न जनतेला विचारा. लोकही नाहीच म्हणून सांगतील. असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी क्रॉस सबसिडी म्हणजे काय याचा अर्थ मला सांगावा. समोरासमोर बसू. मी शंभर प्रश्न विचारतो. त्यांनी पुस्तक पाहून उत्तरे द्यावीत. पण कोणत्या पुस्तकात उत्तर आहे हे सुद्धा त्यांना सांगता येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राऊत यांच्याकडे भाजपच्या शंभर नेत्यांची नावे असतील तर त्यांनी त्वरीत ईडीला पाठवावी. लगेच पाठवावी, असे ते म्हणाले. आमचीही राज्यात सत्ता आहे. आम्हालाही चौकश्या लावता येतात, असा इशारा राऊत यांनी दिला होता. त्याचीही पाटील यांनी खिल्ली उडवली. आता कुणी तुम्हाला अडवले. खुशाल कारवाई करा, असे आव्हानच पाटील यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here