प्रजासत्ताक दिनी गटविकास अधिकाऱ्याच्या विरोधात इंदापूरातील पत्रकार काळ्या फिती लावून करणार निषेध व्यक्त!

0

पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी

इंदापूर । सिद्धार्थ मखरे (प्रतिनिधी)

इंदापूर तालुक्यातील निरवांगी येथील कामाच्या संदर्भात वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार जितेंद्र जाधव यांच्यावर चिडून जावून अश्लील भाषेत वार्चता करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी गटविकास अधिकारी यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या मागणीसाठी इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला असून उद्या प्रजासत्ताक दिनी सर्व पत्रकार काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध नोंदवणार आहेत.

सविस्तर हकीकत अशी की,आज (दि.२५) रोजी पंचायत समिती कार्यालयामध्ये गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या दालनात इंदापूर तालुक्यातील निरवांगी येथील कामाच्या संदर्भातील माहिती घेऊन वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार जितेंद्र लाला जाधव हे गेले असता परीट यांनी चिडून तुम्हाला माहिती देत नाही. तुम्ही काय करायचे करा असे बोलून तुमच्यावर सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्या बद्दल गुन्हा दाखल करतो अशी धमकी देत आरडाओरडा करत अरेरावीची भाषा वापरून मारहाणीच्या उद्देशाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पत्रकाराला पकडण्यास सांगितले.

त्यामुळे पत्रकार जितेंद्र जाधव यांनी याबाबत मुजोर अधिकारी विजयकुमार परीट यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अनन्वये गुन्हा दाखल करण्याच्या मागणी संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे.

सदरील घटनेचे गांभीर्य लक्षात घेता इंदापूर तालुक्यातील विविध वृत्त वाहिनीचे व वृत्तपत्राचे पत्रकार यांनी पोलीस ठाण्यात येऊन संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली असून प्रजासत्ताक दिनी इंदापूर तालुक्यातील पत्रकार काळ्या फिती लावून घटनेचा निषेध व्यक्त करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here