ऍसिड  हल्ला करून ‘तिला’ रस्त्यातच जिवंत जाळले 

लिव्ह इन रिलेशनशिपचे जोडपे दिवाळीला गावाकडे निघाले अन् 

लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची घटना, आरोपी अटक 

बीड:  पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे जोडपे दिवाळीसाठी नांदेड जिल्ह्यातील आपल्या गावी परतत असताना तरुणाने रस्त्यात गाडी थांबवून तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला केला, नंतर पेट्रोल टाकून पेटवून दिले. येळंबघाट (ता. बीड) येथे ही घटना घडली. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. नांदेड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच तरुणीवर अशा प्रकारे निर्दयी कृत्य घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

पीडित तरुणीचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता. राजकीय वर्तुळातूनही कठोर कारवाईची मागणी करण्यात येत होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आरोपी अविनाश राजुरे याला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर २४ तासातच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

घटनेनंतर आरोपी अविनाश राजुरे फरार झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला होता. अखेर आरोपी नांदेड पोलिसांच्या हाती लागला असून त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार आहे.

बीड तालुक्यातील येळंबघाट येथे शनिवारी रस्त्यालगत २२ वर्षीय तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली. शेळगाव ( ता. देगलूर जि. नांदेड ) येथील तरुणी गावातीलच एका तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दि.13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येळंबघाट (ता.बीड ) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा – केज मुख्य रस्त्यावरून जात असताना तरुणाने दुचाकी थांबवली. तरुणीला रस्त्याच्या कडेला घेऊन तिच्यावर तरुणाने अ‍ॅसिड टाकले. त्यांनतर काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले.

तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. अ‍ॅसिड हल्ला आणि पेट्रोलने ४८ टक्के टक्के शरीर भाजले होते. अर्धवट भाजलेल्या अवस्थेत तरुणी तब्बल 12 तास रस्त्याशेजारी पडून होती. दुपारी २ वाजता काही वाहनधारकांना आवाज आल्याने त्यांनी खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तरुणी दिसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून अविनाश राजुरे या तरुणाविरुद्ध नेकनूर ( ता.बीड ) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

महाराष्ट्राला या घटना नवीन नाहीत

“महाराष्ट्राला या घटना नवीन नाहीत, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. फक्त यासंबंधी बैठका न घेता माहिती घेऊन एक स्पेशल फोर्स प्रत्येक जिल्ह्यात विशिष्ट घटना हाताळण्यासाठी लावली पाहिजे, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा दिली जावी, दिवाळीच्या दिवशी असं काही बोलावं लागणे दुर्दैवी आहे.” 
-माजी मंत्री पंकजा मुंडे

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here