नेवासा- मानवी आरोग्यास घातक असलेल्या 'मावा' निर्मिती आणि विक्री विरोधात नेवासा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख १ हजार २०० रुपयांचा तयार मावा आणि कच्चा माल जप्त केला असून, एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, १८ जुलै २०२६ रोजी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना समजले की, पाथरवाला (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथील अमोल लक्ष्मण खाटीक हा आपल्या राहत्या घराच्या आडोशाला असलेल्या पत्राच्या शेडमध्ये मशीनच्या साहाय्याने मानवी आरोग्यास घातक असा 'मावा' तयार करत आहे. या माहितीच्या आधारे नेवासा पोलीस पथकाने पंचांसह छापा टाकला असता, घटनास्थळी तयार मावा, सुपारी, तंबाखू आणि मावा बनवण्याचे मशीन असा एकूण १,०१,२०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
या प्रकरणी अमोल लक्ष्मण खाटीक याच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली.
ही धडक कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक ममुक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनि अमोल पवार, पोउपनि संदीप शिंदे, पोहवा रविंद्र शेळके, पोशी संदीप ढाकणे, पोशी गणेश फाटक व पोशी आप्पासाहेब वैद्य यांनी केली. या मावा बनवणाऱ्यांवर आता १० वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद असलेल्या भा.न्या.सं. कलम १२३ नुसार कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक ममुक्का सुदर्शन यांनी दिले आहेत. परिसरात अशा प्रकारचे अवैध कृत्य कोठेही सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्वरित 'डायल ११२' वर किंवा स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या