चोरावर मोर’... वरुडीत एक चोरी पकडली, मोधळवाडी-कर्जुलेपठारमधून २१ लाखांचे २७२ पाईप गायब!

 


​घारगाव : एक चोरी पकडल्यानंतर दुसऱ्या चोरीचा असा काही ‘महा-स्फोट’ होईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. संगमनेर तालुक्यातील जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनेला चोरट्यांनी मोठा सुरुंग लावला आहे. मोधळवाडी आणि कर्जुलेपठार येथील डेपोतून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २१ लाख ५० हजार रुपयांचे २७२ लोखंडी (डी.आय.) पाईप लंपास केले आहेत. या धाडसी चोरीमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली 
​‘एस.टी.एम. एन्फ्रा प्रा. लि.’ या कंपनीकडे जवळे बाळेश्वरसह १० गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम आहे. ९ जुलै रोजी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली तेव्हा सर्व पाईप जागेवर होते.
​टर्निंग पॉईंट ठरला १५ जुलैचा दिवस! वरुडी पठार येथे काही चोरटे पाईप चोरताना नागरिकांच्या आणि पोलिसांच्या तावडीत सापडले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच कंपनीचे सुपरवायझर कृष्णा कोठवळ यांनी खबरदारी म्हणून आपल्या इतर डेपोमधील पाईप मोजायला सुरुवात केली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली...!

​ डेपो रिकामे, अधिकारी चक्रावले!
​कर्मचाऱ्यांनी जेव्हा दोन्ही मुख्य डेपो तपासले, तेव्हा तिथून लाखो रुपयांचे पाईप गायब झाल्याचे समोर आले:
​मोधळवाडी डेपो: इथे १०० मिमी व्यासाचे २०० पाईप होते. तपासले तेव्हा फक्त ६६ शिल्लक आढळले, म्हणजेच १३४ पाईप गायब!
​कर्जुलेपठार डेपो: इथे १५० मिमी व्यासाचे ३५० पाईप होते. तिथे केवळ २१२ पाईप सापडले, म्हणजेच १३८ पाईप गायब!
​अवघ्या ६ दिवसांत चोरट्यांनी दोन्ही डेपोंमधून एकूण २७२ पाईप (किंमत २१.५० लाख रुपये) लंपास केले.

​ पोलिसांसमोर मोठं आव्हान
​वजनाने प्रचंड जड आणि आकाराने मोठे असलेले हे लोखंडी पाईप चोरट्यांनी नक्की कोणत्या वाहनातून आणि कधी पळवले? एवढी मोठी चोरी होईपर्यंत सुरक्षा यंत्रणा काय करत होती? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. सुपरवायझर कृष्णा कोठवळ यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आता या 'पाईप गँग'चा शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या