अन्न औषध प्रशासनाच्या मंचर येथील कारवाईत राहुरीच्या तिघांचा समावेश, २६ जणांवर गुन्हे




राहुरी - अन्न व औषध प्रशासनाने देशातील सर्वात मोठी कारवाई शनिवारी केली असून पुणे जिल्ह्यातील मंचर येथे केलेल्या कारवाईत सहा जिल्ह्यातील मोठे रॅकेट समोर आले आहे. कृत्रिम दूध निर्मितीच्या संशयातून या प्रकरणात संशयित २६ जणांवर गुन्हे दाखल झाले असून, त्याचे धागेदोरे अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. 
    या संदर्भात माध्यमातून समजलेल्या माहितीनुसार यामध्ये राहुरीतील तीन तर वाळकीचा एक अशा चार जणांवर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये राहुरी तालुक्यातील टाकळीमियामधील मोरवाडी येथील प्रमोद घोरपडे,सोनगाव सात्रळ येथील प्रकाश कडू, राहुरी तालुक्यातील अजित कारंडे, नगर तालुक्यातील वाळकी येथील शुभम गिरवले यांचा समावेश असल्याचे समजते.
शनिवारी दुपारी मंचरच्या नवकार डिस्ट्रीब्यूटर यावर छापा टाकण्यात आला. सुशांत हिंगे यांच्या गोदामामध्ये आणि गाडीमध्ये दूध भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पावडर व काही रसायने आढळून आली. हिंगे यांनी आपण वेगवेगळ्या पावडर आणि व्हेजिटेबल ऑइल, डिटर्जंट, रासायनिक द्रव्ये यांचा फार्मूला तयार करून तो दूध संकलन केंद्र व इतर लोकांना पोचवत असतो अशी कबुली दिली. नंबर एक आरोपी हेमंत टेके, अकलूज हा पावडर पुरवठादार आहे, भिवंडीचा संजोग यादव हा केमिकल पुरवठादार होता. अनेक जिल्ह्यात ही साखळी कार्यरत होती. मंचरच्या आरोपीने आपण विविध जिल्ह्यातील दूध संकलन केंद्राला ही साहित्य पुरवत असल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार रविवारी अहिल्यानगर जिल्ह्यातही विशेषत राहुरी तालुक्यात विविध ठिकाणी मंचर पोलिसांनी स्थानिक अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकले. यावेळी वेगवेगळे साहित्य जप्त करणे एवढेच नव्हे तर आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुरावे हे देखील तपासले गेल्याची माहिती समजली आहे. यात मोबाईल, सीसीटीव्ही. वाहतूक व्यवस्था यातूनच सह आरोपी निष्पन्न करण्यावर भर असल्याचे सांगितले जाते. एकूणच वरील सर्व आरोपींनी संगनमताने, आर्थिक लाभाच्या दृष्टीने अखाद्य विषारी रासायनिक पदार्थ वापरून असुरक्षित व आरोग्यास घातक अन्न कृत्रिम बनावट दूध तयार करून साठवणूक वाहतूक विक्री करून व सामान्य जनतेची फसवणूक केली असून त्यांच्या जीविताला व आरोग्यास गंभीर धोका निर्माण केला. स्वाती म्हस्के या पुणे विभागाच्या अन्न व औषध प्रशासन अधिकारी आहेत. त्यांनी फिर्यादी आहे. त्यानुसार संशयित २६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समजली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या