अहिल्यानगर-सोशल मीडियाचा वाढता वापर होत असताना सायबर गुन्ह्यांचे प्रकारही वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाती तयार करून तिचे फोटो परवानगीशिवाय प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जून रोजी दुपारी सुमारे सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात सायबर गुन्हेगाराने संबंधित तरुणीचे फोटो मिळवून तिच्या नावाने तीन बनावट सोशल मीडिया प्रोफाइल तयार केले. या बनावट खात्यांवरून तिच्या संमतीशिवाय वैयक्तिक छायाचित्रे इंटरनेटवर प्रसारित करण्यात आली. यामुळे तरुणीची बदनामी होण्याबरोबरच तिच्या गोपनीयतेचा भंग झाला.
हा प्रकार निदर्शनास येताच संबंधित तरुणीने तातडीने अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. बनावट खाती तयार करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू असून, सायबर पोलीस विविध डिजिटल पुराव्यांची पडताळणी करत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती, छायाचित्रे आणि अन्य माहिती शेअर करताना नागरिकांनी सतर्क राहावे, अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट किंवा संदेशांना प्रतिसाद देताना काळजी घ्यावी तसेच कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
.jpg)
0 टिप्पण्या