बोल्हेगावात तरुणाचे अपहरण करून निर्जनस्थळी नग्न करून बेदम मारहाण चौघाजणांसह साथीदारांवर गुन्हा दाखल


​अहिल्यानगर:- फिर्यादीच्या भावा

ने एका महिलेला विनाकारण शिवीगाळ करून केलेल्या भांडणाचा रागातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला निर्जनस्थळी नेऊन नग्न करून लाकडी दांडके व बेल्टने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बोल्हेगाव परिसरात घडली आहे. या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घाबरलेला तरुण व त्याचे नातेवाईक फिर्याद देण्यासाठी पुढे येत नसल्याने शेवटी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अब्दुलकादर परवेज इनामदार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.  या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी चार जणांसह त्यांच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
​याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की,  पीडित तरुण फैजान समीर सय्यद (रा. गोविंदपुरा) हा २४ जून रोजी दुपारी बोल्हेगाव चौक येथे रिक्षाचे भाडे घेऊन गेला होता. तेथे आरोपी अमीर शेख आणि अमानत अन्सारी यांनी त्याला आवाज देऊन बोलावले. त्यानंतर त्याला बळजबरीने मोपेड मोटारसायकलवर बसवून बोल्हेगाव येथील एका शेतात घेऊन गेले. त्या ठिकाणी अमानत अन्सारी याने त्याचे मित्र यश शिरसाठ, चेतन सरोदे आणि इतर साथीदारांना बोलावून घेतले. फिर्यादीच्या भावाने एका महिलेला विनाकारण मारहाण व शिवीगाळ केल्याचा राग आरोपींच्या मनात होता. याच कारणावरून अपहरण केलेल्या तरुणाला बोल्हेगाव परिसरातील निर्जनस्थळी एका शेतात नेऊन नग्न करून आरोपी अमीर शेख याने लाकडी दांडक्याने, तर अमानत अन्सारी, यश शिरसाठ आणि चेतन सरोदे यांनी कंबरेच्या बेल्टने व लाथाबुक्क्यांनी फैजान याला बेदम मारहाण केल्याची माहिती नागरिकांच्या चर्चेतून पुढे येत आहे.
​या दरम्यान तेथून जाणाऱ्या नदीम नावाच्या एका ओळखीच्या व्यक्तीने भांडण सोडवले आणि जखमी तरुणाला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले. या घटनेचा व्हिडिओ तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलिसांच्या व्हॉट्सॲपवर आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
​सदर घटनेबाबत भीतीपोटी पीडित तरुण किंवा त्याचे नातेवाईक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येत नसल्याने, अखेर पोलीस प्रशासनाने स्वतः पुढाकार घेऊन सरकारतर्फे हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकशिंगे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल साठे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या