मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अपघाताचे राजकारण करू नये, असे आवाहन केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी या विषयावर यापुढे भाष्य न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अद्याप एफआयआर दाखल झालेला नसल्याचा मुद्दा उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या प्रतिक्रियेनंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या विषयावर अधिक बोलणार नसल्याचे सांगितले.
माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझी हात जोडून विनंती आहे की, त्यांच्यावर आम्ही कोणीही बोलू नये. मी देखील आजपासून या विषयावर बोलणं बंद केलं आहे.”
यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र प्रश्न उपस्थित केले होते. इतर प्रकरणांमध्ये तातडीने एफआयआर दाखल केला जातो, मात्र अजित पवार यांच्या विमान अपघाताला इतके महिने उलटूनही गुन्हा दाखल का करण्यात आला नाही, असा सवाल त्यांनी केला होता. अजित पवार हे सरकारमधील उपमुख्यमंत्री होते, तरी त्यांच्या पक्षातील आमदार व मंत्र्यांनी या प्रकरणावर ठोस भूमिका का घेतली नाही, अशी टीकाही त्यांनी केली होती.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अपघाताच्या चौकशीला वेळ देण्याची गरज व्यक्त केली होती. तपास यंत्रणा आपले काम करत असून, वारंवार माध्यमांमधून चर्चा केल्याने ‘मीडिया ट्रायल’ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच, अजित पवार यांच्या निधनाने कुटुंबावर मोठे दुःख कोसळल्याची भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती.
सुनेत्रा पवार यांच्या या भूमिकेनंतर सुप्रिया सुळे यांनीही आता या संवेदनशील मुद्द्यावर मौन बाळगण्याचा निर्णय घेतल्याने अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीभोवती सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना काही प्रमाणात विराम मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या