‘हात थरथरतो’ म्हणून चिडवायचे; संतापलेल्या वृद्धाचा सहकाऱ्यांवर लोखंडी रॉडने हल्ला, दोघांचा मृत्यू


 अहिल्यानगर : विळद घाट परिसरातील ‘मातोश्री’ वृद्धाश्रमात पहाटेच्या सुमारास झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. हात थरथरत असल्याच्या कारणावरून सहकारी वृद्धांकडून चिडवले जात असल्याचा राग मनात धरून एका वृद्धाने झोपेत असलेल्या सहकाऱ्यांवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेनंतर वृद्धाश्रम परिसरात मोठी खळबळ उडाली. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून हल्ल्यात वापरलेला लोखंडी रॉडही जप्त केला आहे.

पहाटे झोपेत असतानाच हल्ला

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी राजू घुले याचा उजवा हात सतत थरथरत होता. यावरून वृद्धाश्रमातील काही सहकारी त्याची चेष्टा करत असल्याचे सांगण्यात येते. या प्रकाराचा राग मनात धरून घुलेने पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास सहकारी वृद्धांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.

सर्वजण झोपेत असताना लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर आणि पायांवर वार करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या हल्ल्यात मंकाळेश्वर हेणे आणि दत्तात्रेय हारके यांचा मृत्यू झाला. तर गणेश घोडके, बाळासाहेब घाडगे, गोरख फुंदे, साहेबराव भवर, लिंबराज फिसके आणि संतोष पिरगल हे सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यापैकी एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

बहिणीच्या घरी जाणार होता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू घुले हा कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी-कुंभारी येथील रहिवासी असून तो अविवाहित आहे. त्याचे भाचे प्रयाग सानप यांनी ३ नोव्हेंबर २०२५ रोजी त्याला मातोश्री वृद्धाश्रमात दाखल केले होते.

विशेष म्हणजे, घुलेची वृद्धाश्रमातून बहिणीकडे रवानगी होणार होती. त्याला घेण्यासाठी त्याची बहीण नाशिकहून अहिल्यानगरकडे येत होती. मात्र, ती वृद्धाश्रमात पोहोचण्यापूर्वीच ही घटना घडली.

व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक दिलीप चोरडिया यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून हल्ल्यामागील नेमकी कारणे, घटनेपूर्वीचा वाद आणि हल्ल्याची संपूर्ण पार्श्वभूमी याचा तपास सुरू आहे.

वृद्धांना आधार आणि सुरक्षित निवारा देण्यासाठी असलेल्या वृद्धाश्रमातच रक्तरंजित हल्ला झाल्याने या घटनेने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या