नांदेड : पावसातील खंड आणि अनिश्चिततेमुळे शेतीसमोर निर्माण झालेल्या संकटाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी लोहा तालुक्यातील बारूळ फाटा आणि सोनखेड परिसरातील शेतशिवाराला भेट दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकांची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
“मी मराठवाड्याची लेक आहे. या मातीतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणि वेदना मला माहिती आहेत. कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
सोयाबीन पिकाची बांधावर जाऊन पाहणी
बारूळ फाटा येथील शेतकरी संदीप रामराव जायभाय यांच्या शेताला सुनेत्रा पवार यांनी भेट दिली. 9 जुलै रोजी लागवड करण्यात आलेल्या सोयाबीन पिकाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
पिकाची सद्यस्थिती, वाढ, संभाव्य उत्पादन आणि पावसाच्या खंडाचा पिकावर झालेला परिणाम याबाबत त्यांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. शेतातील परिस्थिती समजून घेताना त्यांनी शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
चारा, शिक्षण आणि कुटुंबाच्या खर्चाचीही घेतली माहिती
शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ पिकांच्या नुकसानीपुरत्या मर्यादित नसल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी शेतीसोबतच कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचीही माहिती घेतली. जनावरांसाठी चारा उपलब्ध आहे का, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवला जात आहे आणि दैनंदिन उदरनिर्वाहाच्या कोणत्या अडचणी आहेत, याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.
“शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, जनावरांचा चारा आणि संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हे प्रश्न शासनासाठी महत्त्वाचे आहेत. पावसाची अनिश्चितता आणि आर्थिक संकटाच्या काळात शासन बळीराजाच्या पाठीशी आहे,” असे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांना तातडीने पाहणीचे निर्देश
शेतशिवारातील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपस्थित प्रशासनिक अधिकाऱ्यांकडूनही माहिती घेतली. स्थानिक पातळीवर परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर मदत मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
परभणीतील शेतकऱ्यांची हेक्टरी 50 हजारांची मागणी
दरम्यान, परभणी जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. अनेक भागांत उभी पिके करपल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत असले, तरी केवळ दुष्काळ जाहीर करण्याच्या घोषणांपेक्षा प्रत्यक्ष मदत मिळणे आवश्यक असल्याची भूमिका नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मांडली आहे.
गंगाखेड परिसरातील शेतकऱ्यांनी सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्यासोबतच प्रत्यक्ष नुकसानभरपाई आणि मदत कधी मिळणार, हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरणार आहे.
0 टिप्पण्या