जामीन फेटाळताच दुबईला पलायन; भारतात परतताच विमानतळावर बेड्या! ‘सोर्सकोड’ चोरी प्रकरणात मुख्य संशयित जेरबंद

 


अहिल्यानगर : पुण्यातील नामांकित संगणक सॉफ्टवेअर कंपनीच्या गोपनीय ‘सोर्सकोड’ आणि डिजिटल डेटाच्या कथित चोरीप्रकरणात अखेर पोलिसांच्या हाती मोठा संशयित लागला आहे. न्यायालयांकडून जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दुबईला गेलेल्या मंदार प्रदीप पाथरीकर (३३, रा. नवी पेठ, पुणे) याला भारतात परतताच पुणे विमानतळावर अहिल्यानगर सायबर पोलिसांनी अटक केली.

पाथरीकरविरोधात यापूर्वीच लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. दुबईहून पुण्यात दाखल होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ७ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता त्याच्या चौकशीत कथित सोर्सकोड चोरीमागील नेमके धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे.

सरकारी यंत्रणेसाठी विकसित केलेल्या प्रणालीवरून संशय

पुण्यातील संबंधित कंपनीकडून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांसाठी संगणकीय प्रणाली विकसित केल्या जातात. कंपनीचे प्रमुख धोरण अधिकारी नितीन गोपालदास भराडीया यांनी मार्च २०२६ मध्ये अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या. त्यानुसार दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, मंदार पाथरीकरसह शैला केदार, मुकुंद दायमा, जालींदर गमे, योगेश चव्हाण आणि चैतन्य दिलीप जोशी अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर संशयाला बळ

ग्रामविकास विभागासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने कंपनीने २०२४ मध्ये ‘एकात्मिक एकल पोर्टल’ ही संगणकीय प्रणाली विकसित केली होती. ही प्रणाली १ एप्रिल २०२५ पासून कार्यान्वित करण्यात आली. मात्र, कामाचे देयक प्रलंबित राहणे आणि करार पूर्ण करण्यास झालेल्या विलंबामुळे कंपनीने एप्रिल २०२५ मध्येच सेवा बंद केली.

यानंतर बँकेकडून या प्रणालीचा सोर्सकोड मागण्यात आला. मात्र, त्यासाठी औपचारिक करार नसल्याचे कारण देत कंपनीने सोर्सकोड देण्यास नकार दिला.

दरम्यान, ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बँकेकडून सादर करण्यात आलेली प्रणाली कंपनीने विकसित केलेल्या प्रणालीशी साधर्म्य असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. यानंतर कंपनीने अंतर्गत तपास सुरू केला आणि त्यातून कथित सोर्सकोड चोरीचे धागेदोरे समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

क्लाऊड, ई-मेल आणि हार्डडिस्कचा वापर?

या प्रकरणात काही माजी कर्मचाऱ्यांकडून कंपनीचा गोपनीय डिजिटल डेटा अनधिकृतपणे क्लाऊड प्लॅटफॉर्म, ई-मेल तसेच बाह्य हार्डडिस्कच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

सॉफ्टवेअरचा सोर्सकोड विविध डिजिटल माध्यमांतून कंपनीबाहेर पाठवण्यात आल्याचा दावाही तपास यंत्रणेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ डेटा चोरी झाली की, त्यामागे मोठे व्यावसायिक किंवा आर्थिक हितसंबंध होते, याचा शोध आता घेतला जात आहे.

तीन न्यायालयांतून जामीन नाकारला; थेट दुबई गाठली

मंदार पाथरीकरने जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ आणि सर्वोच्च न्यायालय अशा तीन स्तरांवर त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

यानंतर तो दुबईला गेल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली. अखेर भारतात परतताच पुणे विमानतळावर त्याला अटक करण्यात आली.

आता ‘कोड’मागचा खरा खेळ उलगडणार?

पाथरीकरच्या पोलीस कोठडीमुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे. गोपनीय सोर्सकोड नेमका कोणामार्फत बाहेर गेला? चोरीच्या डेटाचा वापर कुठे झाला? हा डेटा आणखी कोणाकडे पोहोचला? या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांकडून शोधली जात आहेत.

या प्रकरणातील काही संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे पाथरीकरच्या चौकशीतून केवळ त्याची भूमिका नव्हे, तर कथित डेटा चोरीच्या संपूर्ण साखळीचा उलगडा होतो का, याकडे आता लक्ष लागले आहे.

विमानतळावर झालेली अटक ही तपासातील मोठी कारवाई मानली जात असली, तरी सोर्सकोड नेमका कुठे आणि कोणासाठी वापरला गेला, याचे उत्तर तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या