अहिल्यानगर : ‘एनसीडीसी’च्या थकीत कर्ज प्रकरणी अशोक कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी


 अहिल्यानगर : अशोक सहकारी साखर कारखान्याने राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून घेतलेले कर्ज थकवले आहे. त्यामुळे शासनाच्या प्रचलित असलेल्या निर्णयानुसार ‘एनसीडीसी’च्या कर्जाचे व्याज थकवणारे संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. शेतकरी संघटनेच्या तक्रारीनुसार अशोक कारखान्याने ३० ऑगस्ट २०२४ व २५ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्य शासनाच्या हमीवर एनसीडीसीकडून खेळत्या भांडवलासाठी एकूण ९०.३० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. या कर्जाची परतफेड आठ वर्षांत करायची असून, सुरुवातीच्या दोन वर्षांत मुद्दल न भरता दर तीन महिन्यांनी नऊ टक्के व्याज भरण्याची अट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कारखान्याच्या आर्थिक विवरणानुसार ३१ मार्चअखेर व्याजाची सुमारे ३.४७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांनी याबाबत पाठपुरावा चालवला आहे. संघटनेने कर्जावरील व्याज थकबाकीच्या मुद्यावरून अशोक कारखान्यावर प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याची मागणी केली आहे. शासनाच्या १३ सप्टेंबर २०२३ व २५ जून २०२५ रोजीच्या निर्णयांची अंमलबजावणी करावी असा आग्रह धरला आहे. संघटनेने २४ ऑगस्टला प्रादेशिक सहसंचालकांकडे (साखर) तक्रार दाखल केली. याची दखल घेत चौकशीसाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र प्रादेशिक सहसंचालकांनी वेळेत कायदेशीर कारवाई केली नसल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या छ. संभाजीनगर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होणार आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. अजित चोरमले व अॅड. विजय औताडे काम पाहत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या