झरेकाठी/ प्रतिनिधी सोमनाथ डोळे
महाराष्ट्र शासनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केला असून, त्यामध्ये संगमनेर तालुक्याचाही समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये, असे शासनाने निर्देश दिले आहेत. मात्र, शहरातील माजी आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सह्याद्री संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ येणे ही बाब दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत शासनाने शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी संबंधित शैक्षणिक संस्थांकडून होणे अपेक्षित आहे. मात्र, शासनाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जात असल्यास त्याचा आर्थिक भार विद्यार्थ्यांवर पडणार आहे. त्यामुळे संबंधित संस्थांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांनी संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांनी शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये, असे स्पष्ट केले आहे. कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारल्याचे आढळून आल्यास संबंधित संस्थेविरोधात नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.दुष्काळी परिस्थितीत शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारले जात असल्यास त्याबाबतची तक्रार माझ्याकडे किवा प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी. शासनाने परीक्षा शुल्क माफीबाबत दिलेल्या निर्देशांची संबंधित शैक्षणिक संस्थांकडून योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत आहे की नाही, याची प्रशासनाने तपासणी करावी. तसेच विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, यासाठी शाळा-महाविद्यालयांवर लक्ष ठेवावे, अशा सूचनाही आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
.............................................................

0 टिप्पण्या