निवृत्तीच्या उंबरठ्यावर लाचप्रकरणी आयुक्त जाळ्यात!

 


ठेकेदाराची बिले काढण्यासाठी ८० हजारांची मागणी; रवींद्र जाधव यांच्यासह तिघे ताब्यात

मालेगाव : शासकीय सेवेतून निवृत्त होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकले आहेत. ठेकेदाराची प्रलंबित बिले मंजूर करून देण्यासाठी चार टक्क्यांप्रमाणे ८० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी जाधव यांच्यासह आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे मालेगावच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जाधव हे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी शासकीय सेवेतून निवृत्त होणार होते. मात्र, निवृत्तीला अवघे दोन दिवस बाकी असतानाच त्यांच्याविरुद्ध लाचप्रकरणी कारवाई झाल्याने त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी झाडाझडती घेतल्याचे समजते. तपासादरम्यान आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.

धुळ्यातही लाचप्रकरणी झाली होती कारवाई

रवींद्र शेषराव जाधव हे १६ डिसेंबर २०२३ पासून मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी धुळे महानगरपालिकेत प्रभारी अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळत असताना, १४ जानेवारी २०१९ रोजी त्यांच्या निवासस्थानी एका उपशिक्षकाकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुद्ध कारवाई केली होती.

आता मालेगावमध्ये पुन्हा लाचप्रकरणी कारवाई झाल्याने त्यांच्या कार्यपद्धतीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सध्याच्या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

नियुक्तीपासूनच वादाच्या भोवऱ्यात

मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतरही जाधव यांना विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यांच्या नियुक्तीला मालेगावकर विधायक संघर्ष समितीसह काही स्थानिक संघटना आणि आघाड्यांनी विरोध दर्शविला होता. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्याची महापालिकेत नियुक्ती करू नये, अशी मागणी करत आंदोलनही करण्यात आले होते.

महापालिकेतील विविध मुद्द्यांवरून वाद

जाधव यांच्या कार्यकाळात कचरा संकलन निविदा, मोसम नदीचे प्रदूषण, जन्मदाखले आणि महापालिकेतील आर्थिक व्यवहार अशा विविध मुद्द्यांवरून वाद निर्माण झाले होते. या विषयांवर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी आक्षेप नोंदविले होते.

आता ठेकेदाराच्या बिलांसाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून झालेल्या कारवाईमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. निवृत्तीपूर्वी झालेल्या या कारवाईतून नेमके काय निष्पन्न होते, तसेच तपासात आणखी कोणाची भूमिका समोर येते, याकडे प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या