Nana Patekar: जणू काय खडक थोरला...


 'त्याचा काही भरवसा नाही’ हे वाक्य नाना पाटेकरबद्दल जेवढ्यांदा वापरले गेले असेल तेवढे ते इतर कुठल्याही कलावंताबद्दल कुणी म्हणायची शक्यताच नाही. रासवट-रांगडेपणा, एखाद्याला असंस्कृत वाटू शकेल इतपत असभ्य होण्याची तयारी, कवितेची एखादी ओळ काळजाला भिडल्यास चारचौघांत अश्रूंना वाट मोकळी करून देण्यास संकोच न बाळगण्याएवढी तरलता आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या पल्याड जाऊन एखादी व्यक्तिरेखा विश्वसनीय करून दाखवण्याचे अगाध सामर्थ्य यांचे मिश्रण म्हणजे नाना.


‘त्याचा काही भरवसा नाही’ या वाक्यातून अपेक्षित असलेला मनस्ताप आणि त्रास सहन करण्याची सगळ्यांचीच तयारी असे ती त्यामुळेच. पुलंच्या ‘म्हैस’ची रंगावृत्ती आली होती, त्यात निवेदक म्हणून काम केलेला पोरसवदा, किरकोळ शरीरयष्टीचा नाना आणि पुढे अनेक व्यक्तिरेखांना आपल्या अंगभूत प्रतिभेचा स्पर्श करून देणारा नाना - या प्रवासात नाना नावाचे तुफान अवघ्या कलासृष्टीला वर-खाली घुसळवून गेले आणि कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक शांतही झाले.चित्रपटात काम करणे ही अभिनेत्याची स्वतःच्या अविरत शोधाची कथा होऊ शकत नाही; कारण पंधरा-वीस रिटेक झाले तरी फायनल टेकनंतर तो क्षण फ्रीज होऊन जातो; परंतु कलावंत आशयाशी एकरूप झाला असेल आणि नाटकाची तशी ताकद असेल तर रंगभूमीवर ही प्रक्रिया निरंतर सुरू राहू शकते. नानाने विजय तेंडुलकरांच्या ‘पाहिजे जातीचे’मधील ‘बबन्या’ साकारला आणि त्याला प्रचंड दाद मिळू लागली. त्या नाटकाचे सव्वाशे प्रयोग हाउस फुल्ल झाल्यावर नानाने निर्मात्याला पत्र लिहून ‘या नाटकात आता मला नवीन काही करता येत नाहीये’ असे सांगून ते सोडण्याची परवानगी मागितली होती.

याउलट ‘पुरुष’चे १८०० प्रयोग झाल्यावरही त्याला प्रत्येक प्रयोगात ‘गुलाबराव’मध्ये वेगळे काही गवसे. नानाने स्वतः जाऊन अमोल पालेकरांना गळ घातली नसती तर ‘थोडासा रुमानी हो जाये’मधील ‘बारीशकर’साठी त्याचा विचारही झाला नसता आणि नानाने त्या भूमिकेस जो काव्यात्म दर्जा मिळवून दिला आहे तोही कदाचित मिळाला नसता. दिग्दर्शक म्हणूनही नानाने ‘दिसण्याच्या पलीकडे’ जाण्याचे धाडस केले आणि माधुरी दीक्षित, डिंपल यांना ‘प्रहार’मध्ये विनामेकअप पडद्यावर आणले.
अरविंद देशपांडे, रमाकांत देशपांडे, सुलभा देशपांडे आणि विजया मेहता यांना तो आपले गुरू मानत असे. या चौघांच्याही कलाजाणिवांचे संस्कार त्याच्यावर झाले. ‘अंकुश’ ही नानाची व्यावसायिक चित्रपटांकडे वळण्याची सुरुवात. ‘अंकुश’ पाहून पुलंनी नानाला पत्र लिहिले होते आणि त्यात ‘बाजारभावाच्या हिशेबात सुपरस्टार वगैरे नसलेल्या’ नानाचे कौतुक केले होते. त्यानंतर नाना ‘बाजारातला’ सुपरस्टार झाला.

चित्रपटाच्या प्रकृतीप्रमाणे स्वतःची शैली बदलण्याची किमया केवळ असाधारण कलावंतच करू शकतो. निर्विकार चेहऱ्याने क्रौर्याची परिसीमा गाठणारा ‘परिंदा’मधीला ‘अण्णा’ आणि ‘कलमवाली बाई’ला तिखट प्रश्न विचारणारा ‘क्रांतिवीर’मधला ‘प्रताप नारायण तिलक’ ही अभिनयशैलीची दोन टोके. ‘क्रांतिवीर’ पाहिल्यानंतर दिलीपकुमार म्हणाले, ‘नर्गीस जशी ‘मदर इंडिया’चा ठसा पुसू शकली नाही, तसा नाना यापुढे कायम ‘क्रांतिवीर’ म्हणूनच ओळखला जाईल.’ तसे झालेही; पण ‘वेलकम’मधला त्याचा विक्षिप्त डॉन उदय शेट्टीही तेवढाच विश्वसनीय वाटला. गद्य संवादाला पद्याची उंची देण्याची क्षमता असलेला, आशाताईंबरोबर पावसात भिजत गाणी ऐकणारा नाना हा त्याचे खरे व्यक्तिमत्त्व आणि जाणीवपूर्वक तयार केलेली प्रतिमा यांच्या मधोमध कुठे तरी होता.
‘मैं आझाद हूं’ या चित्रपटाचे कौतुक करण्यासाठी नानाने अमिताभ यांना फोन केला होता, तेव्हा ते ‘परिंदा’चे कौतुक करू लागले. नानाने त्यांना थांबवून ‘यासाठी वेगळा फोन करा’ असे सांगितले! हा हिशेबी फटकळपणा नानाने कायम मिरवला. आरती प्रभू हे नानाचे आवडते कवी. चोख व्यावसायिकपणातही ‘नाम फाउंडेशन’सारख्या कामातून माणुसकी जपणाऱ्या नानाला ‘जणू काय खडक थोरला, त्यातसुद्धा मधाचा झरा गोडगोड’ ही आरती प्रभूंची ओळ चपखल लागू होते. असा हा नाना जातानाही ‘त्याचा काही भरवसा नाही’ या वाक्याला जागूनच गेला. नानाला श्रद्धांजली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या