Nagar LCB: स्थानिक गुन्हे शाखा नियुक्तीचा गनिमीकावा यशस्वी!

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची नियुक्ती; पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या निर्णयक्षमतेचे कौतुक

नगर: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नगर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या नियुक्तीची अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घोषणा केली. अनेकांनी या पदासाठी लॉबिंग केले असताना गनिमीकावा पद्धतीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनील कटके यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कटके यांच्याकडे कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यासह कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचा अतिरिक्त पदभार होता. आता पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्याकडे या दोन्ही पोलिस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांची बदली झाल्यानंतर गेल्या महिन्यात हे पद रिक्त झाले होते. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांची या पदी नियुक्ती झाल्यानंतर त्याला काही लोकांनी आक्षेप घेतला व ही बदली रखडली. त्यानंतर काही पोलीस निरीक्षकांच्या नावाची चर्चा झाली, मात्र नाव चर्चेत नसताना अनील कटके यांची अचानक पणे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली.

या पदावर कुणाची वर्णी लागते याकडे पोलिस खात्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कटके यांच्यासह काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात घारगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक निरीक्षक जीवन बोरसे यांची श्रीरामपूर येथील अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयात बदली करण्यात आली. कर्जत पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक मनोहर इडेकर यांना तोफखाना पोलीस ठाण्यात नेमणूक देण्यात आली आहे. तर सहाय्यक निरीक्षक रामेश्वर कायंदे यांना पाथर्डी, सुनील बडे यांना जामखेड, शाहिद खान पठाण यांना बीडीडीएस, दिलीप तेजनकर यांना श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तर दिलीप शिरसाठ यांना जिल्हा विशेष शाखेत नेमणुका मिळाल्या आहेत.

उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांची श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बदली झाली असून पंकज शिंदे यांना संगमनेर शहर पोलिस ठाण्यात नव्याने नियुक्ती मिळाली आहे. पोलीस उपनिरीक्षक रणजीत गट यांना श्रीगोंदा पोलीस ठाण्यात, मधुकर शिंदे यांना राहुरी पोलीस ठाण्यात, अनिल गाडेकर यांना ट्रायल मॉनिटरिंग सेलमध्ये, अशोक लाड यांना साई मंदिर सुरक्षा विभागात, नवनाथ दहातोंडे यांना मानव संसाधन विभागात तर दीपक पाठक यांना नगर एमआयडीसी पोलिस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here