सामान्य माणसांचं बजेट बिघडलं!

कांदा-बटाट्यानंतर आता खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या
नवी दिल्ली : कांदा आणि बटाट्याचे भाव वाढल्यानंतर आता तेलाच्या किंमती देखील वाढल्यामुळे सामान्यांचे बजेट काहीसे कोलमडले आहे. खाण्यामध्ये वापरले जाणारे शेंगदाणा, तीळ, मोहरी, वनस्पती, सोयाबीन, सूर्यफूल या सर्व प्रकारच्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. पाम, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलाच्या किंमतीमध्ये 20 ते 30 टक्क्याने वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्यांप्रमाणे सरकारसमोर चिंता निर्माण झाली आहे. यामुळे किंमती कमी करण्यासाठी योग्य उपाययोजनांच्या विचारात सरकार आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या प्राइस मॉनिटरींग सेलकडून प्राप्त आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की मोहरीच्या तेलाची सरासरी किंमत गुरुवारी प्रति लीटर 120 रुपये होती, गेल्या वर्षी ही किंमत ती प्रति लीटर 100 रुपये होती. एका वर्षापूर्वी वनस्पती तेलाची किंमत 75.25 होती, ती आता वाढून 102.5 प्रति लीटर झाली आहे. 18 ऑक्टोबर 2019 रोजी सोयाबीन तेलाची सरासरी किंमत 110 रुपये प्रति लीटर होती. सूर्यफूल आणि पाम तेलाच्या बाबतीतही हाच कल दिसून आला आहे.
सप्टेंबरमध्ये पामोलीन तेल आणि सोयाबीन तेलाच्या किंमती जवळपास 15 टक्क्यांनी वाढल्या होता. त्याचप्रमाणे मोहरी आणि सूर्यफूलाच्या तेलाची किंमत 30 ते 35 टक्क्यांनी वाढली होती. आता पाम तेलावरील आयात शुल्क कमी करावे की नाही याचा विचार सरकारने केला पाहिजे. कारण पाम तेलाच्या किंमतीतील वाढीचा थेट इतर खाद्यतेलांच्या किंमतींवर परिणाम होतो.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here