गर्दीत चेंगरून कोरोना मेला की काय; अजित पवार

  मुंबई : बेधडक वक्तव्य करणारे आणि कोरोनावर मात केलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील विविध भागात होणा-या गर्दीवर चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाचा फटका सर्व क्षेत्राला बसला असून राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार काम करीत आहे.

मात्र दिवाळीच्या सणामध्ये सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहवयास मिळाली. पुण्यातील बाजीराव रोडवर एवढी गर्दी झाली की,गर्दीत कोरोना चेंगरून मेला की काय असे मला वाटले,पवार असे  म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. येत्या १ डिसेंबर रोजी होणा-या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.

महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी कोरोनाच्या काळात होणा-या गर्दीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी आपल्या भाषणात विरोधकांचाही समाचार घेतला. एकदा करोना झाला म्हणजे पुन्हा होत नाही. हे मनातून काढून टाका,कोरोना पुन्हा मानगुटीवर बसू शकतो. त्यामुळे सर्वानी काळजी घ्या आणि नियमांचे पालन करा असे आवाहन अजित पवार यांनी केले.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असल्याने सरकारकडून करण्यात येणा-या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. काही उमेदवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माझ्यासह अन्य नेत्यांचा फोटो लावून प्रचार करीत असल्याने कार्यकर्त्यांनी खबरदारी घ्यावी असे पवार यावेळी म्हणाले.पुणे पदवीधर मतदारसंघात ६२ उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये अरुण लाड नावाचा अजून एक उमेदवार असल्याने खबरदारी घ्या असे आवाहन त्यांनी केले.

या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीचा चांगल्या प्रकारे प्रचार सुरू असून,पाच जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहेत असा दावाही त्यांनी यावेळी केला.राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार हे मोठे नेते वाटायचे,मात्र राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

त्या टीकेचा समाचार आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला,याला विनाश काले, विपरीत बुद्धी म्हणाव लागेल,असा टोला त्यांनी पाटलांना लगावला. ज्यांची योग्यता आणि पात्रता नाही. त्यांनी पवार यांच्यावर काय टीका करावी,ज्या पवार साहेबांनी समाज आणि राजकारणात 60 वर्ष काम केले आहे.पवार हे महाराष्ट्राची जाण असणारे नेते आहेत. दिल्लीमध्ये त्यांच्या शब्दाला वजन आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या सारख्याला पवार साहेबावर टीका करणे शोभत नाही. त्यामुळे पाटलांचे विधान म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी म्हणावी लागेल अशा शब्दात त्यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here