“अगंबाई अरेच्चा” काळ्या ढगांची चंदेरी, गुलाबी किनार

 लेखक :  डॉ अनिल पावशेकर     *स्कुल डायरीज भाग ०२* 

फर्स्ट डे फर्स्ट शो* ला कानशिलात वार्म वेलकम झाल्याने आम्ही शाळेत *ताकसुद्धा फुंकुन प्यायला लागलो होतो.* प्रत्येक काळ्या ढगाला चंदेरी किनार असते असे ऐकून होतो. मात्र गणिताच्या ढगाला लागली कळ, “डोळ्यातून पाणी थेंब थेंब गळ” अशी आमची अवस्था झाली होती. अखेर गणिताची  शिकवणी लावल्याने आम्ही *गणितगात्र* होण्यापासून बचावलो होतो. तसेच शिक्षकांच्या “मारप्रसादाचा” एवढा धसका घेतला होता की इंग्रजी शिकविणारे प्रेमळ नामजोशी सर असोत की हिंदीचे मित्रवत दुर्गे सर असोत वर्गात आम्ही सापासारखे अंग चोरुन बसत होतो.

अर्थातच हळूहळू शाळेतले वातावरण अंगवळणी पडले आणि आम्ही मोकळा श्वास घेणे सुरू केले होते. मुख्य म्हणजे क्लासरुमच्या डाव्या बाजूच्या खिडक्यांजवळ बसायला मित्रमंडळी फार उत्सुक असायचे. कारणही तसेच होते. त्याबाजूला लोकमान्य मुलींची शाळा अगदी लागून असल्याने काळ्या ढगांची ही चंदेरी, गुलाबी किनार लक्षात यायला आम्हाला थोडा वेळच लागला.

हळूहळू ओळखपाळख वाढू लागली आणि मित्रमंडळीत मी मिसळू लागलो. माझ्या आजुबाजुला *आवंडे आणि गावंडे नावाचे दोन मित्र बसायचे*. मी शिक्षकांच्या नजरेस पडणार नाही अशा ॲंगलने दोघांच्या मधात दडून बसायचो. त्यातही गावंडे हा शुद्ध शाकाहारी आणि सात्त्विक मित्र होता. तो इतका साधा होता की माझ्या वाटणीचा मार त्याने आनंदाने खाल्ला असता.

दुसऱ्या बाजूला आवंडे मात्र एकदम *बिनधास्त आणि उडे दिल बेफिक्रे होता*. तो वर्गात जरी बसला असला तरी त्याची नजर सतत वर्गाबाहेर म्हणजेच मुलींच्या शाळेकडे भिरभिरत असायची आणि तिकडे होणाऱ्या, दिसणाऱ्या घटनांचे *आंखो देखा हाल* तो मला अविरत सांगत सुटायचा. सोबतच *जब हम जवां होंगे, जाने कहा होंगे* हे त्याचे आवडते गाणे वारंवार ऐकवायचा. इतर मित्रमंडळीत किशोर भोयर म्हणजे साक्षात विठूमाऊलीचा अवतार होता. शांत, सुस्वभावी आणि हुशार विद्यार्थ्यात त्याची गणना होत होती तर तुषार डबले एकदम भडभड्या होता. आणखी एक वल्ली होती प्रशांत नावाची. गुणवंत,मेरीटचा विद्यार्थी परंतू अभ्यासावर लक्ष फारसे केंद्रीत नसल्याने थोडा ढेपाळलेला होता.


त्यावेळी आम्ही जुना वणी नाका परिसरात रहायचो आणि प्रशांतसुद्धा त्याच भागात रहायचा. विशेष म्हणजे प्रशांतचे नाव एका सुंदर सुस्वरूप मुलीशी जोडले जायचे. यातील खरेखोटे देवच जाणे परंतु ती मुलगी खरोखरच *फुलोंसा चेहरा तेरा, कलीयोंसी मुस्कान है*, *रंग तेरा देखके, रूप तेरा देखके कुदरत भी हैराण है* अशीच होती. तसेही “सोळाव वरिस धोक्याच” असं उगाचच नाही म्हणत. कारण याच वयात हार्मोन्सचा केमीकल लोच्या होऊन गोंधळ उडत असतो. मात्र त्याकाळी प्रेमविवाह हा अक्षम्य गुन्हा होता‌. *दिवारोमे चुनवा देंगे*, *तू मेरा मरा हुआ मुंह देखेगा*, *खानदानकी नाक कटवा दी* सारखी घरच्यांची डायलॉग बाजी चरम सिमेवर होती.


यातूनच मग प्रेमविरांनी पळून जायची टुम निघाली होती. कालखंडानुसार आता या प्रक्रियेत बदल झाला असून आता तर एखाद्याने अरेंज मॅरेज केले तर लोक त्याच्याकडे बावळटासारखे पाहतात. मात्र या सर्व रणधुमाळीत घरुन पळून जाऊन लग्न करायची कला लुप्त पावत आहे. प्रेमाची वादळवाट पहिले सारखी वेडीवाकडी न राहता फोरलेन झाल्याने प्रेमजोडपे सुसाट निघालेले आहेत. एवढेच कशाला प्रेमपत्र लिहण्याची कला मोबाईल संस्कृतीने लयास गेली असून *वर्क फ्रॉम होम* च्या युगात कधीकाळी अगतिक वाटणारा प्रेमींचा संवाद आता अनलिमिटेड फ्री कॉल मुळे सुसंवादात रुपांतरीत झाला आहे.


आम्ही मात्र गालावरचे वळ सुकले नसल्याने याबाबतीत दोन पाऊले मागेच रहायचो. तसेही मुलींच्या शाळेकडे भटकल्यास दे दणादण फटके बसण्याची हमखास गॅरंटी असल्याने *भिक नको पण कुत्रा आवर* अशी आमची मन:स्थिती होती. मात्र एकदा तरी तिकडे फिरुन यावे असे मनोमन वाटत होते. एखाद्या बाबीवर बंधने घातली तर आपण उलटपणे आणखी तिकडे जास्त आकृष्ट होतो हा नैसर्गिक नियम आहे, याला अपवाद नसणारच. तरीपण उगाचच कशाला कपाळमोक्ष करून घ्यायचा म्हणून मनाला समजावत होतो. मात्र *दिल तो पागल है, दिल दिवाना है* असल्याने आणि मनाशी एकदा खुणगाठ बांधली की शेंडी तुटो वा पारंबी आम्ही नेहमीच छातीला माती लावून मैदानात उतरत असल्याने आमची ही मनिषा भविष्यात पुर्ण झाली मात्र त्याकरीता आम्हाला नवनीतचे गाईड आणि विकासची बालविद्या मार्गदर्शक अत्यंत उपयोगी पडली.

क्रमश:,,,,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here