Recipe : हिरव्या मटारची मसालेदार उसळ

साहित्य

– दाणे/ अडीच वाट्या ताजे मटार दाणे
– दोन लहान बटाटे किंवा एक मध्यम मोठा बटाटा (वापरला नाही तर चालेल पण यामुळे जरा रस्सा मिळून येतो आणि खरपूस बटाटा चवीला फार टेस्टी लागतो)
– १०/१२ लसूण पाकळ्या
– पेरभर आल्याचा तुकडा
– ३/४ हिरव्या मिरच्या (तिखट कमी हवं असेल तर कमी घेता येतील पण वगळू नका; हिरव्या मिरचीचा स्वाद हवाच)
– एक मध्यम मोठा कांदा
– एक मोठा टोमॅटो
– पाव चमचा लाल तिखट
– पाव चमच्याहून जरा कमीच हळद
– चवीनुसार मीठ
– तेल
– मोहोरी
– हिंग (मिळत असेल तर हिरा हिंग वापरावा; फारच मस्त स्वाद येतो. हिरा हे कंपनीचं नाव नाहीय)
– सावजी मसाला (नेहेमीचा काळा + गरम मसाला किंवा गोडा मसाला + जराशी धणे-जिरेपूड + लवंग-दालचीनीपूड + गरम मसाला; यांतून जवळपासची चव साधेल)
– वाटी/ दोन वाट्या कढत पाणी

पाककृती

– मटारदाणे निवडून, धूवून चाळणीत/रोवळीत निथळत ठेवावे; कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. बटाट्याची सालं काढून मध्यम आकाराच्या फोडी करून पाण्यात घालून ठेवाव्यात
– लसूण, आलं आणि हिरवी मिरची यांना मिक्सरमधून बारीक करून घ्यावं; पाणी वापरायची गरज नाही. थोडं जाड राहीलं तरी चालेल
– लोखंडी कडई असेल तर ती वापरावी नाहीतर नेहेमीच्या जाड बुडाच्या भांड्यात जरा दमदमीत तेल घेऊन तापत ठेवावं
– तेल तापलं की मोहोरी आणि हिंग घालून फोडणी करावी
– यात आलं, लसूण मिरचीचा पेंड टाकून जरा परतायचं मग कांदा घालून परतायचंय. यानंतर बटाटा घालून जरा होऊ द्यायचा; मग निथळलेले मटार घालून तेलावर जरा परतायचे
– सगळ्या भाजीला तेल-मसाला माखला की मग हळद, लाल तिखट, सावजी मसाला आणि मीठ घालून पुन्हा परतायच
– यात आता टोमॅटो च्या फोडी आणि कढत पाणी घालून उसळ्/भाजी शिजू द्यावी
– झाकण घालून भाजी मस्त उकळू द्यावी
– सगळं नीट शिजलं की मसालेदार तरीही मटारामुळे जराचा गोडसरपणा असलेली भाजी/उसळ तयार आहे
– गरमागरम टेष्टी उसळ, गरम फुलके आणि ताज्या गाजर-फ्लॉवर-मिरचीच्या लोणच्या बरोबर हाणावीवाढणी/प्रमाण: भाजीप्रमाणेअधिक

टिपा

– भाजी शिजली की अंगाबरोबर रस्सा राहील एव्हढं आधणाचं पाणी हवं
– लाल तिखट आणि हिरवी मिरची फार नको; मसाल्याचा जरा झणका आणि मटाराचा गोडसरपणा यावर भाजी जिंकेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here