Editorial: आधी मद्यालये, मग देवालये, शेवटी महाविद्यालये..!

3

उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अखेर महाविद्यालय 15 तारखेपासून सुरू करण्याची घोषणा केली आणि अनेक महिन्यांपासून ची प्रतीक्षा संपली. खरंतर कोरोनाकाळानंतर संपूर्ण जनजीवन पूर्वपदावर आले असताना महाविद्यालये का बंद? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. मात्र शासनाकडून त्याचे अपेक्षित उत्तरही मिळत नव्हते. काही दिवसांपूर्वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. लहानग्या मुलांना शाळेत जायला धोका नाही, मग महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना काय धोका? असा प्रश्न जनसामान्यांना पडणे साहजिक आहे. त्याबाबत मात्र शासनाकडून योग्य तो खुलासा शेवटपर्यंत झाला नाही पण कालच्या शासनाच्या निर्णयामुळे महाविद्यालये सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.

कोरोना संसर्ग कमी होऊ लागल्यानंतर हॉटेलांपासून मॉलपर्यंत, सार्वजनिक वाहतुकीपासून मुंबईतील लोकल सेवेपर्यंत साऱ्या गोष्टी हळूहळू सुरू झाल्या; परंतु महाविद्यालयांबाबत राज्य सरकार मौन बाळगून होते. कोव्हिडची साथ उतरणीला लागण्याच्या काहीशा आधीच याच सरकारने नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले. ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या; त्यामुळे रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आणि साथ आणखी सौम्य झाल्यानंतर पाचवी ते आठवी इयत्तांच्या शाळाही उघडल्या. अकरा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांचे शिक्षण पूर्ववत करण्यासाठी कौतुकास्पद प्रयत्न करणाऱ्या सरकारने, उच्च शिक्षणाबाबत घेतलेले धोरण मात्र तर्कविसंगत होते. अठरा ते चोवीस वर्षे वयोगटातील मुले-मुली उच्च शिक्षण घेतात. लॉकडाउनमधील ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा या मुलांसाठीही होत्या.

कोव्हिडचा धोका तर सर्वांनाच आहे. अशा वेळी शाळा सुरू होतात, तर महाविद्यालये का नाही, हा प्रश्न होता. शहरांमधील महाविद्यालयांतील अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील असतात आणि ते वसतिगृहात राहतात. कोव्हिडमुळे एका खोलीत एकाच विद्यार्थ्याला राहावे लागत असल्याने अडचणी आहेत. त्यामुळेच, महाविद्यालये बंद ठेवल्याचा युक्तिवाद सरकारकडून केला जातो; परंतु तो तोकडा आहे. पन्नास टक्के क्षमतेनेच महाविद्यालये सुरू करायची असल्याने, वसतिगृहातही निम्म्याच मुलांना बोलविता आले असते; त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्यात कालापव्यय झाला असून, त्याचा फटका मुलांनाच बसणार आहे. सर्व क्षेत्रांवर करोनाचा परिणाम झाला असला, तरी शिक्षणावर झालेल्या परिणामांना अनेक आयाम आहेत. आता नवसाधारण स्थितीला सर्वांत आधी जुळवून घेतलेले क्षेत्रही शिक्षणाचेच आहे. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यातच आपल्याकडे ऑनलाइन वर्ग सुरू झाले. सुरुवातीच्या नवलाईनंतर त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. एक तर ऑनलाइन शिक्षणासाठीचा सशक्त आशय आपल्याकडे नाही. दुसरे म्हणजे, सर्वांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट जोडणी नव्हती. तिसरे म्हणजे, प्रत्यक्ष वर्गातील अध्यापनाद्वारे साधली जाणारी परिणामकारकता यातून येत नाही. विविध अभ्यासांतून हेच निष्कर्ष निघाले. त्यामुळेच साथ ओसरताच वर्ग सुरू करण्याची मागणी होत होती. ती लक्षात घेऊन शाळा उघडल्या. उच्च शिक्षणाबाबत मात्र दिरंगाई झाली.

दिवाळीनंतर करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात होती; परंतु तसे झाले नाही. उलट साथ ओसरली आणि निर्बंध शिथील होत गेले. सारे सुरळीत असताना महाविद्यालयीन विद्यार्थी मात्र घरी बसून ऑनलाइनवर एखाद-दुसरा तास शिकत होते. विज्ञान, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र यांसह अनेक व्यावसायिक विद्याशाखांत प्रात्यक्षिकांचे महत्त्व अनन्य आहे. प्रयोगशाळांतूनच विद्यार्थी अधिक परिणामकारक शिकत असतात; त्यामुळे किमान प्रात्यक्षिके तरी सुरू करावीत, अशी मागणी डिसेंबरमध्ये होत होती. त्याकडे काणाडोळा झाला. विद्यार्थी आणि पालकांकडून मागणी होऊ लागल्यानंतर विद्यापीठांकडून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांनाही सरकारने केराची टोपली दाखवली. मागणीचा रेटा वाढविल्यानंतर मंत्र्यांनी प्रथम वीस जानेवारीचा, मग फेब्रुवारीचा पहिल्या आठवड्याचा वायदा केला. विद्यापीठांचे कुलपती असलेल्या राज्यपालांनी कुलगुरूंची बैठक घेतल्यानंतरही ‘तारीख पे तारीख’चा खेळ सुरू होता. अखेर बुधवारी तो खेळ थांबला. कोरोनाने आपले जीवन बदलले, गरजा बदलल्या. शासनानेही आवश्यक बाबींचा प्राधान्यक्रम बदलला. आधी मद्यालये, मग देवालये आणि शेवटी महाविद्यालये, हा नवा प्राधान्यक्रम तयार झाला, असेच म्हणावे लागेल.

3 COMMENTS

  1. Hmm it seems like your website ate my first comment (it was super long) so I guess I’ll just sum it up what I submitted and say, I’m thoroughly enjoying your blog. I as well am an aspiring blog blogger but I’m still new to the whole thing. Do you have any recommendations for first-time blog writers? I’d really appreciate it.

  2. The workmanship and quality of the hair ring are very good. The Zhawanzi is very beautiful on the head, very fluffy and has a lot of hair quality, and it is natural, I like it very much.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here