बहुरूपीचा मुलगा बनला पीएसआय

शिक्षण घेत असताना रायरंदची भूमिका करत असे

 ब्राह्मणी :

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शहर व गावोगावी फिरणाऱ्या राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील `बहुरुपी` सर्जेराव शेगर यांच्या मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक  पदापर्यंत यश मिळविले.

गत १२ वर्षापासून पुणे शहरात विविध पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावणारे ब्राम्हणी गावचे भूमिपुत्र तान्हाजी सर्जेराव शेगर हे एमपीसीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

तान्हाजी शेगर यांचे प्राथमिक शिक्षण ब्राह्मणी जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण सोनई येथील आदर्श विद्या मंदिर व दादासाहेब रुपवते विद्यालय नगर येथे झाले. पुढे डीएड केले.

दरम्यान पोलीस भरतीत उतरण्याचा निर्धार केला.अन् पहिल्याच प्रयत्नात यश आले.  १० फेब्रुवारी २००९ पासून पुणे शहरातील बंडगार्डन, वाहतूक शाखा व अलंकार पोलीस स्टेशन येथे कर्तव्य बजावले.

सध्या एसीपी कार्यालय सिंहगड येथे कार्यरत आहेत. दरम्यान पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सन २०११ पासून एमपीएससी परीक्षा देत होते. अनेकदा प्रयत्न केले. अखेर अथक परिश्रमानंतर सन २०१७ मध्ये पार पडलेल्या एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले.

न्यायालयीन प्रक्रियेमुळे निकाल लागण्यास विलंब झाला. १० फेब्रुवारी २०२१ रोजी निकाल लागला. योगायोग असा की तान्हाजी शेगर हे याच तारखेला (१० फेब्रुवारी २००९) पोलीस सेवेत दाखल झाले.

१२ वर्षाच्या पोलीस सवेत त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे कर्तव्य बजावताना सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका बजावली. त्यामुळे अल्पावधीतच पोलीस प्रशासन व सर्वसामान्यांमधून लोकप्रिय पोलीस बनले.

या यशात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा हातभर असल्याचे शेगर सांगतातत. नाथपंथी डवरी गोसावी समाजातील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले तान्हाजी शेगर यांनी शिक्षण घेत असताना बालपणी सुट्टीच्या दिवसात बहुरूपीचे काम केले.

कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांनी बालपणी बनावट पोलीस बनून रायरंद ची भूमिका केली. पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदारी फिरले. त्याच वेळी भविष्यात पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. अन् आज ते सत्यात उतरले.

  तान्हाजी यांना दोन भाऊ व चार बहिणी आहेत. भाऊ आजही बहुरूपीचे काम करतात. वडील सर्जेराव यांनी सुरुवातीपासून कुटुंब व समाजासाठी संघर्ष केला. नाथपंथी डवरी गोसावी समाजाचेते अध्यक्ष आहेत. समाजाच्या विविध प्रश्नबाबत त्यांचा कायम पुढाकार असतो. 

नाथपंथी डवरी समाजासह अन्य समाजातील तरुणांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना उद्योग व्यवसाय व प्रशासकीय नोकरीसाठी मार्गदर्शन करणार आहे. याशिवाय योग्य तेवढी मदत करू. पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झालो. भविष्यात पोलीस प्रशासनातील आणखी वरिष्ठ पदावर जाण्याचा प्रयत्न आहे. अशी प्रतिक्रिया पोलीस उपनिरीक्षक तान्हाजी शेगर यांनी दिली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here