काँग्रेस- राष्ट्रवादीच्या कुरघोडीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपाचा विजय

 

कर्जत :
जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे विश्वासू शिलेदार बाळासाहेब साळुंके यांच्या पत्नी मीनाक्षी साळुंके यांचा भाजपाचे विखे समर्थक असणारे अंबादास पिसाळ यांनी अवघ्या एका मताने पराभव केला. वास्तविक पाहता साळुंके यांच्या पेक्षा हा पराभव आ रोहित पवार यांचा ठरला. कारण आ पवार यांनी कर्जतची जिल्हा बँकेची निवडणूक आपल्या हाती घेतली होती. मात्र पिसाळ यांचा विजय भाजपासाठी आणि माजी मंत्री राम शिंदे व खा सुजय विखेसाठी नवसंजीवनी देणाराच ठरला. या जय- पराजयाने आगामी काळात होऊ घातलेल्या कर्जत नगरपंचायतीच्या स्थानिक निवडणुकीत फरक पडणार हे मात्र नक्की…
अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक असणारे काँग्रेसच्या मीनाक्षी साळुंके आणि भाजपाकडून अंबादास पिसाळ यांच्यात यंदा सरळ लढत पहावयास मिळाली. राजकीय समीकरणे पाहता या निवडणुकीत साळुंके यांचा विजय सहज साकारला जाईल असा अंदाज बांधला जात होता. आ रोहित पवार यांनी साळुंके यांच्यासाठी व्ह्यूव्हरचना देखील आखली होती. जिल्हा बँकेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ मतदार आ पवार यांनी सहलीवर नेले होते. त्यावर ते स्वता जातीने लक्ष देत होते. आणि राजकारणातील सरळ व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे साळुंके कुटुंब येथेच फसले. साळुंके यांनी आपली मान राष्ट्रवादीच्या खांद्यावर टाकली आणि त्याच ठिकाणी घात झाला. सहलीवर नेलेल्या मतदारानी कोणाचा आदेश मानला आणि साळुंकेच्या विरोधात मतदान केले हे न समजणारे कोडे ठरले. वास्तविक पाहता साळुंके यांनी स्वताची यंत्रणा कामाला लावली असती तर आज त्यांच्या गळ्यात जिल्हा बँकेच्या संचालकपदाची माळ पडली असती. मात्र जिल्हा आणि तालुक्यातील सर्वाचे राजकीय अंदाज फेल ठरवणारे अंबादास पिसाळ यांनी आपला विजय गनिमी काव्याने साकार करीत भाजपाला पुन्हा कर्जतच्या राजकारणात नवसंजीवनी दिली. पिसाळ यांनी एका मताने विजय साकार केला असला तरी तो भाजपासाठी लाख मोलाचा ठरला आहे. याच विजयाने आ रोहित पवार यांचा विजयीरथ रोखण्याचे काम पिसाळ यांच्या विजयारूपाने माजी मंत्री राम शिंदे आणि खा सुजय विखे यांनी केले आहे.
 जिल्हा बँकेच्या निवडणुकीत साळुंके यांच्या झालेल्या पराभवाने आगामी काळात होऊ घातलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत त्याचे पडसाद उमटले जातील. राज्य सरकारमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार कार्यरत आहे. त्यामुळे कर्जत नगरपंचायत निवडणुकीत देखील हेच मित्रपक्ष आपली आघाडी कायम ठेवतील अशी आशा बाळगली जात होती. मात्र जिल्हा बँकेत साळुंके यांना  मित्रपक्षाने दिलेला दगा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके सहज विसरणार नाहीत. त्यामुळे आगामी महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत ते आघाडी करतील की ? जिव्हारी लागलेल्या पराभवाने ते स्वबळाचा नारा देतील तो येणारा काळच सांगेल. या जय- पराजयाने कर्जतचे स्थानिक राजकारण पुरते ढवळून निघाले आहे.
 तीन दादा एकत्र असून पराभव झाला कसा ?
 जिल्हा बँक निवडणूकीत काँग्रेसच्या मीनाक्षी साळुंके यांच्याकडे आ रोहित पवार, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके तर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्यासह राष्ट्रवादीची ताकद उभी होती. राजकारणातील तिन्ही “दादा” दिमतीला असताना मीनाक्षी साळुंकेचा पराभव महाविकास आघाडीसाठी विचार करणारा ठरेल. कारण विजयी संखेपेक्षा जास्त मतदार काँग्रेस- राष्ट्रवादीकडे असताना नेमकी कोणी आणि कुठे माशी शिंकली ? यांचे कारणे स्वता आ पवार यांना शोधावे लागतील. सध्या तरी कर्जतची राष्ट्रवादी आरोपीच्या कट घरात उभी आहे एवढे मात्र नक्की
 पिसाळाचा विजय भाजपासाठी लकी
अंबादास पिसाळ यांनी स्थानिक राजकीय समीकरणे उलटे करत जिल्हा बँक निवडणुकीत आपला विजय साकार केला. हा विजय पिसाळ यांच्या पेक्षा भाजप आणि माजी मंत्री राम शिंदे व खा सुजय विखे यांच्यासाठी लाभदायक ठरला आहे. रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त केल्यानंतर भाजपाला उतरती कळा लागल्याचे राजकारणात दिसत होते. मात्र बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सहज मिळणारा विजय शिंदे आणि विखे यांनी हिरावून घेतल्याने आगामी स्थानिक राजकारणात याचे पडसाद उमटतील अशी चर्चा पहावयास आणि ऐकावयास मिळत आहे.
 साळुंकेची कृपा आणि विधानसभेला रोहित पवार
खरे पाहता कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसच्या वाट्याची. यंदाच्या निवडणुकीत त्या जागी मीनाक्षी साळुंके उमेदवारी करतील अशी चर्चा पहावयास मिळत होती. मात्र या जागेवर रोहित पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीकडून मागणी करण्यात आली होती. यावेळी साळुंके यांनी मनाचा मोठेपणा दाखवत कोणतेही आडे-वेडे न घेता ती जागा राष्ट्रवादीला सहज बहाल केली. यासह विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे पवार यांचे काम केले. रोहित पवार यांच्या गळ्यात विजयी माळ टाकण्यात साळुंके यांचा खारीचा वाटा न विसरणारा असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here