राहुल रसाळ यांना उद्यान पंडीत पुरस्कार

0

पारनेर :

पारनेर तालुक्यातील निघोज येथील प्रगतीशिल शेतकरी राहुल अमृता रसाळ यांना राज्य शासनाकडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा उद्यान पंडीत पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य शासनाच्या वतीने ३१ मार्चच्या शासन निर्णयाने या पुरस्कारांची घोषणा झाली. राज्यातील प्रगतशील शेतकरी बांधवांसाठी त्यांच्या सन्मानार्थ हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात.

 

 

राहुल रसाळ यांनी द्राक्ष व डाळींब शेतीत विविध नवीन्यपुर्ण प्रयोग राबवले आहेत. त्यांच्याकडे ४५ एकर शेती आहे. त्या पैकी २० एकर द्राक्ष तर १० एकर डाळींब आहे. उरलेल्या १५ एकरवर ते भाजीपाला पिकवतात. राहुल हे कृषी पदवीधर असुन त्यांनी आज पर्यत स्वखर्चाने ८ देशांचा शेती अभ्यास दौरा पुर्ण केलेला आहे. त्यांनी ब्राझील येथील नावाजलेल्या क्रीमसन द्राक्ष  वानाची लागवड प्रथमच केली आहे.

 

निघोज परिसरात कुकडी प्रकल्पाचे पाणी आल्यानंतर सन १९९० ला त्यांचे वडील अमृता रसाळ यांनी प्रथमच डाळींब व द्राक्ष बाग लागवड केली होती. आधुनिक शेतीचे बाळकडू त्यांना वडिलांकडूनच मिळाल्याचे त्यांनी सांगितले. राहुल रसाळ यांचा सेंद्रिय शेतीकडे कल आहे. त्यासाठी आज त्यांच्याकडे १० गीर गायी आहेत. शेण व गोमुत्रापासुन ते स्लरी तयार करतात. त्यासाठी मोठा टँक त्यांनी बनविला आहे. बागांना स्लरी सोडण्याचे ट्रॅक्टर संचलीत यंत्र त्यांनी स्वतःच्या कल्पकतेने तयार केले आहे. त्यांची सर्व शेती ठिबक सिंचनावर आहे.

 

आच्छादन व  क्रॉप कव्हर याचाही ते वापर करतात. कारले, कर्टुली, ढोबळी, टॉमॅटो ईत्यादी भाजीपाला पिके ते घेतात. त्यांची द्राक्षे गेल्या २० वर्षापासुन युरोपात निर्यात होत आहेत. डाळींबाच्या भगवा, गणेश जातीची त्यांनी परिसरात प्रथमच लागवड केली होती. त्याची शेती पाहुन परिसरातील शेतकरी आधुनिक पद्धतीने करू लागले. शेतीचे काटेकोर नियोजन व हिशोब ते ठेवतात. द्राक्षाच्या तास ए गणेश, सुपर सोनाका, शरद सीडलेस , क्रिमसन, माणिकचमन अशा वानांची लागवड त्यांनी केली आहे. कृषी पदवीधर असलेल्या राहुल यांना त्यांची पत्नी, आई , वडील व भाऊ मदत करतात.

 

 

संपुर्ण यांत्रिकीकरणामुळे शेतीला कमी मजूर लागत असल्याचे ते सांगतात. राज्य शासनाने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना शेतीक्षेत्रातला मानाचा समजला जाणारा पुरस्कार जाहीर केल्याने त्यांचे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांना यापुर्वी विविध पुरस्कार मिळालेले आहेत. राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्याने आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. परिसरातुनही त्यांचे कौतुक होत आहे. पन्नास हजार रुपये रोख, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच त्यांना प्रदान केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here