नक्षलवादाचा बिमोड करा

1

छत्तीसगडच्या बीजपुर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २३ जवान शहीद झाले तर ३५ जवान जायबंदी झाले. शिवाय २१ जवान बेपत्ता झाले आहेत. नक्षलवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. नक्षलवाद्यांचा हा हल्ला भारतीय सार्वभामत्वावरील हल्ला असून त्याचा जितका निषेध करावा तितका कमी आहे.

नक्षलवाद्यांनी भारतीय सैनिकांवर केलेला हा पहिलाच हल्ला नाही. याआधीही त्यांनी भारतीय सैनिकांवर अनेक हल्ले केले असून त्यात हजारो सैनिक शहीद झाले आहेत. २०१० साली दंतेवाडाच्या जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्यात ७४ सैनिक शहीद झाले होते. नक्षलवाद्यांनी केलेला हा हल्ला आजवरचा सर्वात मोठा आणि भीषण असा हल्ला होता. त्यानंतरही नक्षलवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात अनेक छोट्या मोठ्या चकमकी झडल्या आहेत. मध्यंतरी सरकारने नक्षलवादी नेत्यांशी चर्चेचा प्रस्ताव ठेवला.

 

चर्चेच्या काही फेऱ्याही झडल्या या चर्चेतून काही नक्षलवादी शरण आले त्यामुळे सरकारने नक्षलवाद संपला असा दावा केला होता या हल्ल्याने त्याला छेद मिळाला आहे. नक्षलवाद संपला नसून नक्षलवाद आणखी उग्र झाला असल्याचे या हल्ल्यातून सिद्ध झाले आहे त्यामुळेच आता नक्षलवादाचा बिमोड करण्याची वेळ आली आहे. शांततेच्या आणि चर्चेच्या मार्गाने नक्षलवाद संपेल असे वाटत नाही. चर्चेच्या आणि बंदुकीच्या फैरी एकाच वेळी झडू शकत नाही हे सरकारने नक्षलवादी नेत्यांना ठामपणे सांगायला हवे. नक्षलवाद संपवायचा असेल तर सरकारलाही जशास तसे असे वागावे लागेल. नक्षलवाद्यांना जर बंदुकीच्या गोळीचीच भाषा समजत असेल तर सरकारनेही त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यायला हवे. गेल्या सात दशकांपासून नक्षलवाद समस्या देशाला पोखरत आहेत.

 

 

नक्षलवाद ही समस्या केवळ एका प्रांताची किंवा राज्याची नसून ती संपूर्ण देशाची समस्या बनली आहे त्यामुळेच देश पोखरून काढणारी ही नक्षलवादाची कीड मुळासकट उपटून टाकायला हवी. केंद्र सरकार तसेच विविध राज्य सरकारांनी आपले दुर्गम आदिवासी भागाबद्दलचे धोरणही बदलायला हवे. हे धोरणच नक्षलवाद्यांच्या पथ्यावर पडत आहे. नक्षलवाद संपवण्यासाठी सरकारने आजवर जे धोरण आखले आहे ते फोल ठरले आहे म्हणूनच नक्षलवाद संपवण्यासाठी सरकारने ठोस असे नवे धोरण आखायला हवे. नक्षलवाद्यांचा अहिंसेवर विश्वास नसून हिंसा हेच त्यांचे तत्व आहे. नक्षलवाद्यांचा भारतीय कायद्यावर, संविधानावर विश्वास नाही. त्यांचा फक्त हिंसेवर विश्वास आहे त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे योग्य ठरेल.

 

नक्षलवाद आणखी फोफावू द्यायचा नसेल तसेच भारतीय सैनिकांचे आणखी रक्त सांडू द्यायचे नसेल तर सरकारला नक्षलवादाचा बिमोड करावाच लागेल त्यासाठी कठोर पावले उचलावी लागतील. श्रीलंके सारखा छोटा देश लिट्टे सारख्या हिंसक संघटनेचा बिमोड करू शकतो तर भारतासारख्या देशाला नक्षलवादाचा बिमोड करणे सहज शक्य आहे त्यासाठी गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची. सरकारने ती इच्छाशक्ती दाखवली तर नक्षलवादाचा कायमचा बिमोड होऊ शकतो.
                                                                                                      श्याम बसप्पा ठाणेदार
                                                                                                         दौंड जिल्हा पुणे

1 COMMENT

  1. Hiya, I’m really glad I have found this info. Today bloggers publish just about gossips and internet and this is really frustrating. A good web site with interesting content, that’s what I need. Thanks for keeping this website, I will be visiting it. Do you do newsletters? Can’t find it.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here