Covid: लसीकरणासाठी श्रीरामपूरच्या व्यापाऱ्याची उच्च न्यायालयात याचिका..!

0

श्रीरामपूर नगरपालिकेने लसीकरण सुविधा देण्याची मागणी


श्रीरामपूर: शहरातील व्यापाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे अशा नोटीस नगरपालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना दिल्या परंतु शहरात लसीकरणाची कोणतीही सुविधा निर्माण न केल्याने शहरातील जवाहर एजन्सीचे मालक प्रकाश गदिया यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोनामुळे लागलेल्या मिनी लॉकडाऊन काळात शहरातील अत्यावश्यक सेवेचे काम करणाऱ्या व्यापाऱ्यांनी लसीकरण करावे म्हणून नगरपालिका प्रशासनाने नोटीस पाठविल्या. मात्र श्रीरामपूर नगरपालिकेने शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची कोणतीही सुविधा उभारली नाही. मुळात सर्वप्रथम शहरात सरकारी लसीकरणाची सुविधा निर्माण करणे, मुबलक लस उपलब्ध करणे पालिकेकडून अपेक्षित आहे मात्र असे न करता थेट व्यापाऱ्यांना नोटिसा पाठविण्याचा महाप्रताप पालिका प्रशासनाने केला.

नगरपालिकेच्या चुकीच्या व मुजोर प्रशासकीय वर्तवणुकीमुळे शहरातील व्यापा-यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. व्यापारी प्रकाश गदिया यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याचिकाकर्त्यांतर्फे उच्च न्यायालयात ऍड. मजहर जहागीरदार, ऍड. तुषार चौदांते, ऍड. सौरभ गदिया हे काम बघत आहे.
चौकट- नगरपालिकेने कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुविधा निर्माण करणे अपेक्षित आहे. कोणतीही सुविधा न देता व्यापाऱ्यांना नोटीस पाठविणे संतापजनक आहे. नगरपालिकेने तात्काळ लसीकरण सुविधा सुरू न केल्यास व्यापारी, नागरिकांसह पालिकेत ठिय्या आंदोलनाचा इशारा नगरसेविका सौ. स्नेहल केतन खोरे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here