जि.प.चे काेविड सेंटर वाघोलीत सुरु

0

नागरीकांनी कोरोना चाचणी, लसीकरण तसेच विलगीकरण केंद्राची मदत घ्यावी – सुभाष जगताप

वाघोली :

जिल्हा परिषदेच्या वतीने वाघोली येथील कोविड सेंटर पुन्हा सुरु केले असून कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी नागरीकांनी कोरोना चाचणी, लसीकरण तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी या विलगीकरण केंद्राची मदत घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या सौ. कल्पना सुभाष जगताप तसेच माजी पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप यांनी केले आहे.


वाघोली (ता. हवेली) येथे बीजेएस शैक्षणिक संकुलात पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला भेट देवून जगताप यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड तसेच डॉ. हरीष लोहार यांच्याकडून कोविड सेंटरमधील रुग्ण, क्षमता, सुविधा तसेच लसीकरणाची माहिती घेतली. यावेळी त्यांच्या समवेत लोणीकंदचे माजी उपसरपंच रविंद्र कंद, तसेच डोंगरगावचे माजी सरपंच विक्रम गायकवाड, विशाल कोतवाल उपस्थित होते.
याबाबत बोलताना जगताप म्हणाले, सध्या शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने ही साखळी कशी तोडायची हा मोठा प्रश्न आहे. यावर वेळीच तपासण्या तसेच विलगीकरण व उपचार तसेच पात्र नागरीकांचे लसीकरण हेच उपाय आहेत.

यावर प्राथमिक उपाययोजनांसाठी पुर्व हवेलीतील प्रामुख्याने पेरणे – वाडेबोल्हाई व वाघोली जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या सुविधेसाठी कोविड विलगीकरण केंद्र सुरु केले आहे. कोरोना बाबत शंका आल्यास नागरीकांनी वेळीच वाघोली येथील केंद्रात कोरोना चाचणी करुन घ्यावी तसेच विलगीकरण केंद्रात रहावे, जेणेकरुन त्यांचा इतरांना संसर्ग होणार नाही.

तसेच पात्र नागरीकांनी लसीकरण मोहिमेअंतर्गत नोंदणी करुन प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणही करुन घ्यावे. यासाठी या कार्यक्षेत्रातील सर्व गावच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही नागरिकांना या शासकीय सुविधेबाबत माहिती द्यावी, असेही आवाहन जगताप यांनी केले. दरम्यान प्राथमिक आराेग्य केंद्रांना
आजवर गरजेच्या अनेक वस्तु दिल्या असून यापुढेही साधनसुविधा कमी पडु देणार नाही, अशीही ग्वाही त्यांनी दिली.


दरम्यान वाघोली येथील कोविड सेंटरअंतर्गत आजवर ९९९६ नागरीकांचे लसीकरण करण्यात आले असून लस वाया जाण्याचे प्रमाण शून्य टक्के असल्याचे डॉ. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तर सध्या या विलगीकरण केंद्रात लक्षणे नसलेले २५ रुग्ण असून तातडीच्या उपचाराची गरज भासल्यास त्यांना बेडच्या उपलब्धतेनुसार पुढील उपचारांसाठी पुण्यातील कोविड सेटरमध्ये हलविण्यात येत असल्याचे
डॉ. हरीष लोहार यांनी सांगितले.
……….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here