‘रेमडेसिवीर ‘चा तातडीने पुरवठा करावा आ. विखे यांची केंद्रीय पथकाकडे मागणी

0
शिर्डी :
कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा तातडीने व्हावा, कोविड चाचण्यांचे अहवाल स्थानिक पातळीवरच मिळावेत म्हणून केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय पाहणी पथकाकडे केली.
कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय पथकाने शिर्डी येथे पाहणी करून, कोविड उपाययोजनांचा आढावा घेतला. बैंगलोर येथील एनआयएचएममधील डॉ. एन. गिरीषराव, दिल्ली येथील सप्तरजंग रुग्णालयातील डॉ. गुदीया यांच्या पथकाने कोविड सेंटरला भेट देऊन माहिती घेतली. आमदार विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या शिष्टमंडळाची भेट घेऊन प्रमुख मागण्या केल्या. प्रामुख्याने कोविड रुग्णसंख्या वाढत असताना आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
अन्न व औषध प्रशासन तसेच जिल्हा रुग्णालयाच्या समन्यवयाअभावी इंजेक्शनच्या वितरण व्यवस्थेत होत असलेला गोंधळ खुप गंभीर आहे. ही बाब त्यांनी प्रामुख्याने केंद्रीय समितीच्या निदर्शनास आणून दिली. उपलब्ध असलेला इंजेक्शनचा साठा नियोजनपुर्वक वितरीत होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आ.विखे पाटील यांनी या समितीशी चर्चा करताना विषद केली. कोविड चाचण्यांचे अहवाल येण्यास बराच कालावधी लागतो. यासाठी चाचण्यांचे हे अहवाल स्थानिक पातळीवरच मिळावे याकरीता शिर्डी शहरामध्ये चाचणी केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी आ.विखे पाटील यांनी याप्रसंगी केली.
या शिष्टमंडळात शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिचंद्र कोते, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, मंगेश त्रिभूवन, नितीन कोते, अशोक गोंदकर, अशोक गायके, रवि गोंदकर, या शिष्टमंडळातील सर्व सदस्यांनीसुद्धा रेमडीसीवीर इंजेक्शनंच्या समस्या या केंद्रीय समितीच्या निदर्शनास आणून दिल्या. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संदिप सांगळे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, शिर्डी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी आधिकारी रविंद्र ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के, तहसिलदार कुंदन हिरे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
केंद्रीय समितीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरला तसेच राहाता येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन लसीकरण मोहीमेचा आढावा घेतला. रेमडेसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याही दूरध्वनीवरुन चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी श्री.साईबाबा संस्थानच्या रुग्णालयास तातडीने रेमडेसीवीर इंजेक्शनचे डोस उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here