Home Human Interest आळंदी मंदिरात माऊलींचे गणेशावतार चंदनउटी रूप

आळंदी मंदिरात माऊलींचे गणेशावतार चंदनउटी रूप

0

आळंदी  :

 माउली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत चैत्र महिन्यात गुढी पाडव्यापासून श्रीचे संजीवन  समाधीवर रोज चंदन उटी लेप लावण्यात येतो. त्यास गुढी पाडव्या पासून उत्साहात सुरुवात झाली. गुढी पाडव्यास श्रीचे संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार वापरून श्रीचे समाधीवर गणेशावतार श्री चिंतामणीचे वैभवी रूप चंदनउटीतून साकारण्यात आले.

 

 

 यासाठी शिल्पकार अभिजित धोंडफळे व त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. मंदिरात पाडव्या निमित्ताने लक्षवेधी फुलांचा वापर करून मुकुंद कुलकर्णी व सहकारी यांनी मंदिर सजविले. यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष तुळशीराम भोसले यांनी विशेष सहकार्य केले.

 

 

आळंदी मंदिरात गुढी पाडव्या निमित्त श्रीना पवमान अभिषेक करण्यात आला.  परंपरेने श्रीचे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे यांचे हस्ते गुढी पुजन झाले. वारकरी शिक्षण संस्थे तर्फे ५ वारकरी यांचे उपस्थितीत उल्हास महाराज सूर्यवंशी यांचे कीर्तन झाले. दरम्यान मंदिरात पहाटे घंटानाद, काकडा, श्रीना दुधारती, धुपारती आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले.

 

आळंदी मंदिरात भाविक, नागरिक, साधक यांना दर्शनास मंदिर बंद असल्याने यावर्षी मंदिरातील कार्यक्रम शासनाचे मार्गदर्शक सूचना व आदेश व नियमांचे पालन करीत मोजक्याच वारकरी, सेवक, पुजारी, व्यवस्थापनातील सेवक, कर्मचारी यांचे उपस्थितीत झाले. नेहमी प्रमाणे मात्र दर्शनास भाविकांची उपस्थिती नव्हती. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी देवस्थानच्या मंदिरातील प्रथा प्रमाणे पाडव्याचे धार्मिक महत्व ओळखून नियोजन केले.

 

 

 आळंदी शहर व पंचक्रोशीत ठीकठीकांनी घराघरांवर गुढी उभारण्यात आली. अनेक ठिकाणी नवीन उपक्रमांचे आयोजन झाले.  नव्या उत्साहात युवक तरुणांनी हिंदू नववर्षांचे स्वागत केले.  युवक तरुणांनी खरेदी केलेल्या वाहनांची पूजा परिसरात मंदिर प्रांगणात उत्साहात करण्यात आली. दरम्यान वारकरी शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिना निमित्त आळंदीत हरीनाम जयघोष मोजक्याच वारकरी यांचे उपस्थितीत करण्यात आला. यावर्षी साखरेच्या गाठ्या मात्र पुरेशा प्रमाणात उपल्ब्ध झाल्या नाहीत. मागील वर्षांचा स्टॉक वर नागरिकांना समाधान मानावे लागले.

 

सामाजिक बांधीलकीतून वृक्ष संवर्धन

सामाजिक बांधिलकी जोपासत आळंदी जनकल्याण फाउंडेशन तर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पादुका वडगाव रस्ता येथे वृक्षांचे संवर्धन अंतर्गत झाडांना पाणी देत वृक्ष संवर्धन मोहीम राबविण्यात आली. यावेळी फाऊंडेशनचे सचिव अर्जुन मेदनकर, गोविंद तौर, शिवाजी भोसले, सुनील घुंडरे आदी उपस्थित होते. वारकरी शिक्षण संस्थे तर्फे परंपरेने प्रसाद वाटप करण्यात आले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here