आजचे आकाश निरीक्षण: चंद्राभोवतीचे खळे

Rajendra Shinde:

आकाशात ढगांतील हिमकणांमुळे जी विविध प्रकारची तेजोवलये तयार झालेली दिसतात त्यामध्ये २२° चे खळे (Halo) हे एक सुंदर दृश्य आहे. ह्यामध्ये सूर्य किंवा चंद्राभोवती आकाशात अंदाजे २२° त्रिज्येचे वर्तुळाकार तेजस्वी कडे तयार झालेले दिसते. अशा कड्याला खळे म्हणतात. आकाशात तंतुमेघ किंवा तंतुस्तरमेघ आले असता सूर्यप्रकाश किंवा चंद्राचे चांदणे / किरण जेव्हा ह्या ढगातील सूक्ष्म पण लक्षावधी षटकोनी हिमकणातून आरपार जातात तेव्हा त्यांचे वक्रीभवन होते आणि असे खळे दिसते.२२° खळे हे बरेच मोठे म्हणजे आपला हात आकाशात सूर्य किंवा चंद्राच्या दिशेने पूर्ण लांब केला असता पसरलेल्या तळहाताएवढी अंदाजे त्रिज्या असेल तेवढे दिसते. असे खळे हे सर्वसाधारणपणे आकाशात बऱ्याच वेळा म्हणजे इंद्रधनुष्य दिसते त्यापेक्षा जास्त वेळा दिसते.🌕

थोडे समजून घेवू या….

जेव्हा प्रकाशकिरण ६०° शिरोकोन असणाऱ्या षटकोनी हिमकणातून आरपार जातात तेव्हा त्यांचे दोनदा वक्रीभवन होऊन ते २२° ते ५०° कोनातून वळतात. त्यांचा वळण्याचा कमीत कमी कोन हा अंदाजे २२° ( लाल तरंग लहरींसाठी अचूक २१.८४° तर नील तरंगांसाठी २२.३७°) असतो . प्रत्येक तरंगांसाठी हा कोन वेगळा असल्याने अशा खळ्यातील आतील कड लालसर तर बाहेरील कडा निळसर दिसते.

अशा हिमकणांमुळे सर्वच प्रकाशाचे वक्रीभवन होते पण ठरावीक ठिकाणाहून बघणाऱ्याला त्यापैकी फक्त २२° तून वळलेल्या प्रकाशाचेच कडे दिसते. २२°’पेक्षा कमी कोनातून प्रकाशाचे वक्रीभवन होत नसल्यामुळे अशा कड्याच्या आत प्रकाश नसतो व त्यामुळे आतील आकाश मात्र काळे दिसते.

२२° चे खळे हा तसा अनेकदा दिसणारा परिचित देखावा असला तरी ज्यामुळे तो दिसतो त्या हिमकणांचा खरा आकार आणि त्यांची स्थिती ह्याबद्दल वैज्ञानिकांमध्ये अजूनही एकमत नाही. षटकोनी आकारातील अस्ताव्यस्त स्थितीतील हिमकण अशा खळ्याला कारणीभूत होतात असे सर्वसाधारण मत नेहमी दिले जाते पण असे हिमकण त्यांच्या वायगतिकीय (aerodynamic) गुणधर्मांमुळे अस्ताव्यस्त स्थितीत न राहता समांतर स्थितीत असतात. त्यामुळे खळ्याच्या निर्मितीमागे फक्त हेच कारण असेल ह्याबद्दल एकमत झालेले नाही. ढगातील बंदुकीच्या गोळीच्या आकाराचे हिमस्तंभांचे समूहही हे खळे तयार होण्यास कारणीभूत ठरत असावेत असा कयास आहे.

ज्या हिमकणांमुळे खळ्याची निर्मिती होते ते कण व्यक्तिसापेक्ष असतात म्हणजेच प्रत्येक व्यक्तीसाठी ते वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला दिसणारे खळे हे वेगळे व एकमेकाद्वितीय (Unique ) असते. अगदी शेजारी शेजारी उभे राहून खळे पाहणाऱ्या व्यक्तीही प्रत्यक्षात वेगवेगळी खळी पहात असतात.

शास्त्र
सूर्याभोवती किंवा चंद्राभोवती ज्यात कडे दिसते असा आणखी एक देखावा म्हणजे त्यांच्या भोवती दिसणारे तेजोवलय ( corona). अशा वलयांची आणि २२° च्या खळ्याची बऱ्याचदा गल्लत केली जाते. पण अशी वलये ही २२°च्या खळ्यापेक्षा बरीच छोटी पण काहीशी रंगीत आणि सूर्यालगत किंवा चंद्रालगत असतात. ती ढगातील हिमकणाऐवजी सूक्ष्म जलबिंदूमुळे तयार होतात.

जनमानसातील समजुती

जनमानसात चंद्राभोवती पडणाऱ्या खळ्याबद्दल बऱ्याच गैरसमजुती आहेत. येणाऱ्या वादळाची ती चाहूल असते ही त्यापैकीच एक.[७] इतर तेजोवलये किंवा खळ्याप्रमाणे २२° खळीसुद्धा आकाशात तंतुमेघ किंवा तंतुस्तरमेघ आले असतानाच दिसतात आणि बऱ्याचदा एखादे मोठे वादळ येण्यापूर्वी काही दिवस काही वेळा ह्या ढगांचे आगमन होते.[८] त्यामुळे ह्या समजुतीला असा तोडका मोडका काहीतरी आधार आहे असे म्हटले तरी चालेल. पण असे ढग काही वेळा वादळाची शक्यता नसतानाही येऊ शकतात. त्यामुळे हे खळे म्हणजे वादळाचे पूर्वचिन्ह असे खात्रीलायक म्हणता येत नाही. दुसरी समजूत म्हणजे असे खळे हे राजाला वाईट असते. ही समजूत कशी काय निर्माण झाली हे कळणे कठीण. पण नाहीतरी आताच्या युगात राजा आणि त्याचं राज्य अशा गोष्टी राहिलेल्या नाहीत. त्यामुळे अशा समजुतींकडे दुर्लक्ष करून आपण आकाशात दिसणारा हा दुर्लभ पण सुंदर देखावा शक्य तेव्हा पाहावा हेच उत्तम.

3 COMMENTS

  1. Do you mind if I quote a couple of your posts as long as I provide credit and sources back to your weblog? My blog site is in the exact same niche as yours and my visitors would really benefit from a lot of the information you provide here. Please let me know if this ok with you. Many thanks!

  2. Do you have a spam issue on this website; I also am a blogger, and I was wanting to know your situation; many of us have created some nice practices and we are looking to trade solutions with others, why not shoot me an email if interested.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here