DSP मनोज पाटील यांच्या कार्यपद्धतीने पोलीस दलाचे मनोबल उंचावले!

कार्यतत्परता आणि विनम्रतेने भारावले अधिकारी-कर्मचारी…

कमलेश गायकवाड । राष्ट्र सह्याद्री

नेवासा फाटा :

कोविड-19च्या पार्श्वभूमीवर व्यस्त आणि तणावपूर्ण दैनंदिनीतून वेळ काढून कोरोनाग्रस्त अधिकाऱी तसेच कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांना भक्कम मानसिक आधार देण्याच्या अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या कार्यपद्धतीमुळे जिल्ह्यातील पोलीस दलाचे मनोबल उंचावले असल्याचे दिसून आले आहे.

अहमदनगरचे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील हे करड्या शिस्तीचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांचा अनुभव दांडगा असल्याने खाकीच्या आडून कोणता अधिकारी, कर्मचारी वावगे वर्तन करतो, यावर त्यांची विशेष करडी नजर असते. त्यामुळेच त्यांची ज्या जिल्ह्यात नियुक्ती होते तेथील कायदा-सुव्यवस्था परिस्थिती झपाट्याने सुधारत असल्याचा अनुभव आहे. त्यांची कार्यपद्धती जाणून असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांना फणसाची उपमा देतात. फणस ज्याप्रमाणे वरुन खरबरीत असतो व आतून तितकाच गोड त्याप्रमाणे पाटील यांची कार्यपद्धती असल्याचे पोलीस दलात बोलले जाते. कामाच्या बाबतीत ते जितके कर्तव्यकठोर दिसून येतात तितकेच आपल्या कनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनाबाबतीतही ते विशेष सजग असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैयक्तिक पातळीवर कोणतीही अडचण आल्यास आणि त्याबाबत पाटील यांच्या कानावर गेल्यास ते त्यात व्यक्तीशः लक्ष घालून ती सोडविण्यास प्राधान्य देत असतात. पाटील यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून सूत्रे स्विकारल्यापासून कर्तव्यावर जितके त्यांचे लक्ष दिसून येते तितकेच पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यालाही त्यांनी महत्व दिल्याचे दिसून येते. कुटुंब प्रमुखाच्या भुमिकेतून पाटील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैयक्तिक पातळीवर देत असलेले पाठबळ त्यांना नवी उर्जा मिळवून देत असल्याची चर्चा पोलीस दलात ऐकवायस मिळते.

कोविड-19च्या चपाट्यातून पोलीस अधिकारी, कर्मचारीही सुटलेले नसल्याचे दिसून आले आहे. अशा प्रकारे लागण झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन करुन त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस पाटील वेळोवेळी करताना दिसत आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांची श्रेणी न पाहता तो आपला एक सहकारी आहे या एकमेव भावनेतून ते व्यक्तीशः परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे पहावयास मिळाले आहे. कोविडग्रस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची फोनवरुन चौकशी करताना पाटील त्यांच्या तब्येतीची चौकशी तर करतातच परंतु, ‘व्यवस्थित जेवण करा, औषधे वेळेवर घ्या, मन प्रसन्न ठेवा’ इतक्या बारीकसारीक चौकशा करुन काहीही अडचण आल्यास माझ्याशी तात्काळ संपर्क साधा, असा सल्लाही ते देताना दिसतात. त्यांच्या अशा प्रकारे आस्थेवाईक चौकशी करण्याने तसेच कोविड सारख्या भयंकर आजारपणात मानसिक आधार देण्याने जिल्ह्यातील पोलीस दलाचे मनोबल उंचावले असून आपण एकटे नाहीत आपल्या पाठीशी पाटील यांच्यासारखा भक्कम आधारवड असल्याचे समाधान त्यांच्यात दिसून येते.

विनम्रपणा…एरवी पोलीस ठाण्याचा अधिकारी आपल्या कनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांशी अरेरावीने बोलताना सर्रास पहावयास मिळते. मात्र जिल्हा पोलीस प्रमुख असलेले मनोज पाटील साध्या शिपाई श्रेणीतील कर्मचाऱ्याशीही अदबीने बोलताना दिसून आले आहेत. त्यांच्या संभाषणाने पोलीस कर्मचाऱ्यांना आपण स्वप्न तर पाहत नाही ना? असा प्रश्न पडत नसेल तरच नवलच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here