Health : कोरोना काळात शिक्षकांसमोर मानसिक, आर्थिक आणि तांत्रिक अडचणी

परसराम उगले 

नगर (प्रतिनिधी) : कोरोना काळात शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामध्ये तांत्रिक पायाभूत आणि काही क्षणी आर्थिक समस्यांचा सुद्धा समावेश आहे. ग्रामीण भागात नेटवर्कच्या अडचणी घरी, सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांकडे फोन आदींची सुविधा असण्याचे अडचणी, घरी मुलांचा अभ्यास होत नाही अशी पालक आणि विद्यार्थ्यांची मानसिक समाज. या सर्व समस्यांवर मात करून शिक्षकांना शिकवावे लागते हे त्यांच्या पुढचे एक मोठे आव्हान आहे.

 श्रीमती संगीता जाजगे या माध्यमिक विद्यालय इसळक निंबळक तालुका अहमदनगर येथे कायमस्वरूपी शिक्षिका आहेत. त्यांच्याशी बोलताना  हल्लीच्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांपुढे काय काय अडचणी येतात त्या त्यांनी सांगितलेल्या आहे . श्रीमती संगीता जाजगे बोलताना म्हणतात की ” कोवीड मुळे आम्हा शिक्षकांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागते, पहिली गोष्ट म्हणजे मानसिक अस्वस्थता कारण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवताना जो आनंद होतो तो ऑनलाइन शिकवण्यात नाही. 

ऑनलाईन शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष शिकवण्या मध्ये एक वेगळी ऊर्जा आणि उत्साह मिळतो, याव्यतिरिक्त ग्रामीण भागामध्ये ऑनलाइन शिक्षणामध्ये अनेक समस्या आहेत. माझी शाळा ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे बहुतांशी पालक वर्ग हा शेतीमध्ये आणि एमआयडीसीमध्ये कामाला जातो, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध होत नव्हता वेळेवर वर्ग घेणे शक्य नव्हते. ह्या  पायाभूत समस्या सोडवण्यासाठी मी एक ॲप तयार केले. युट्युब वर एक चॅनल देखील सुरू ‌केले आणि सर्व विषयांचे व्हिडिओ टाकले त्यामुळे खूप विद्यार्थ्यांना त्याच्यापासून फायदा झाला. त्यांच्या वेळ आणि सोयीनुसार त्यांना अभ्यास करता येऊ लागला आहे”.

पुढे संगीता जाजके म्हणतात “मधल्या काळात इयत्ता नववी व दहावी चे वर्ग सुरू झाले होते तेव्हा मास्क आणि सामाजिक अंतर पाळण्याच्या अटीमुळे प्रत्यक्ष शिकवताना सुद्धा समस्या येत होत्या.  वेगवेगळ्या ठिकाणाहून विद्यार्थी शाळेत येत असल्यामुळे रोगाची लागण पसरू नये याचेही दडपण शिक्षकांवर होते. त्यानंतर गावाचा कोविड सर्वे करण्याचीही ड्युटी आली. सुरुवातीच्या काळात पगारामध्ये पंचवीस टक्के कपात झाली पण फारशी अशी आर्थिक अडचण आली नाही. कोविड मुळे विद्यार्थ्यांचे जे आज शैक्षणिक, मानसिक आणि बौद्धिक नुकसान होत आहे त्यासाठी मन हेलावून जाते. शाळेमध्ये प्रत्यक्ष विद्यार्थ्यांवर जे संस्कार होतात ते ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये होत नाही याची खंत वाटते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही परिस्थिती लवकरात लवकर इर घेवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते”.   

श्रीमती संगीता जाजगे यांच्या मुलाखतीनंतर कोरोनामुळे शिक्षकांसमोर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचा अंदाज येतो. अनेक शिक्षक-शिक्षिका विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी वेगवेगळे उपक्रम स्वतः सुरू करत असल्याचं दिसतं.  बिकट परिस्थितीवर मात करून यांनी पर्याय शोधून काढले आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आग्रह थांबवला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here