मास्कचा वापर आणि विल्हेवाट कशी करावी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे ही जीवनावश्यक गरज बनली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे ही काळाची गरज आहे. मागील वर्षी जेंव्हा कोरोनाची पहिली लाट आली होती तेंव्हा आपल्याकडे मास्कची कमतरता जाणवत होती पण आज मात्र मुबलक प्रमाणात मास्क उपलब्ध  आहेत. दररोज लाखो मास्कची निर्मिती होत आहे. नागरिकांनाही मास्कचे महत्व पटल्याने मास्कचा वापर वाढला आहे.

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवल्याने तज्ज्ञांनी दोन मास्क वापरण्याची सूचना केली आहे. काही तज्ज्ञांनी घरातही मास्क वापरावा असा सल्ला दिला आहे तर काही तज्ज्ञांनी मास्क हा आपला कायमचा सोबती राहणार असल्याचे भाकीत केले आहे.  त्यामुळे मास्कचा वापर वाढला आहे.

मात्र वापरल्यानंतर मास्कचा हा अतिरेकी साठा किंबहूना कचरा ( मेडिकल वेस्ट ) ची विल्हेवाट कशी लावायची  हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांना या मेडिकल वेस्टची विल्हेवाट कशी लावायची हे माहीत नसल्याने वापरलेले मास्क कचरापेटीत, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर फेकतात. तज्ज्ञांच्या मते कोरोनासोबत लढताना मास्कचा कमतरतेच्या समस्येपेक्षा जास्त मोठी समस्या वापरलेल्या जिवाणू, विषाणूयुक्त मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावणे ही आहे. एरव्ही केवळ डॉक्टर आणि नर्सच्या चेहऱ्यावर दिसणारे मास्क आता सर्वसामान्य माणसांच्या चेहऱ्यावर  दिसत आहेत.

मात्र कोटींच्या संख्येत असलेल्या या मास्कची विल्हेवाट कशी लावायची याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे वापरलेले मास्क कचरापेटीत, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी पडलेले दिसत आहेत.

मास्कची विल्हेवाट कशी लावायची हे माहीत नसल्याने  मास्क सार्वजनिक ठिकाणी सापडत आहेत. भविष्यात वापरलेल्या मास्कमुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.

घरगुती कचऱ्यात वापरलेले मास्क टाकले तर घरापासून डम्पिंग यार्ड पर्यंत तो कचरा हाताळणारे अनेक लोक संक्रमित होण्याचा धोका वाढतो.  सध्या देशात कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेले लाखो रुग्ण गृहविलागीकरणात आहे. गृहविलागीकरणात असलेले हे रुग्ण त्यांनी वापरलेला मास्क घरगुती कचऱ्यात टाकून देत आहेत त्यामुळे सामाजिक आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.

शिवाय मास्क पॉलीप्रॉपोलियन या पदार्थापासून बनलेले असतात. या पदार्थाचे वैशिष्ट्ये म्हणजे उघड्यावर फेकल्यावर तो पॉलिथिन सारखाच लवकर नष्ट न होताच वर्षानुवर्षे टिकतो त्यामुळे भविष्यात पर्यावरणाचा प्रश्नही निर्माण होणार आहे त्यामुळे मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. तज्ज्ञांच्या मते वापरलेले मास्क थेट डस्टबिनमध्ये टाकू नये.

मास्कची विल्हेवाट लावण्याच्या चार सुरक्षित पद्धती आहेत. 

१) वापरलेल्या मास्कला पाण्यात पाच थेंब ब्लिचिंग पावडर मिसळून तयार केलेल्या द्रवात पाच ते दहा मिनिटे निर्जंतुक करा मग कागदात गुंडाळून डस्टबिनमध्ये टाका

२) सोडियम हायपोक्लोराईट आणि पाण्याचे द्रव वापरुन त्यात मास्क निर्जंतुक करून मग कागदात गुंडाळून डस्टबिनमध्ये टाका. 

३) जर घराजवळ तुमच्या मालकीची मोकळी जागा असेल तर खोल खड्डा करून त्यात मास्क पुरा.

४) सर्वात सुरक्षित पद्धत म्हणजे वापरलेले मास्क सुरक्षित ठिकाणी जाळा. प्रत्येक मास्कचा ठराविक कालावधी असतो. कालमर्यादा संपल्यानंतर तो मास्क सुरक्षित राहत नाही त्यामुळे एकच मास्क अनेक दिवस वापरू नका ते धोकादायक आहे. कालमर्यादा संपलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट लावून नवीन मास्कचा वापर करा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here